नगर जिल्हा शिक्षक बँकेसाठी आज मतदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बहुचर्चित जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेसाठी उद्या (रविवारी) मतदान होत असून, सोमवारी नेप्ती परिसरातील अमरज्योत मंगल कार्यालयात मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी 10 हजार 456 शिक्षक आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या 21 जागांसाठी मतदान प्रक्रिया होत असून, ही निवडणूक लांबल्यामुळे काही शिक्षकांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन निवडणूक घेण्याची मागणी केल्यानंतर आहे त्या टप्प्यापासून पुन्हा हा निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला होता. 21 जागांसाठी 93 उमेदवार रिंगणात असून, गुरुमाऊली (तांबे गट), गुरुमाऊली (रोहकले गट), गुरुकुल, सदिच्छा असे 4 मंडळ या निवडणुकीत उतरले असून, त्यांचे एकूण 84 उमेदवार व 9 अपक्ष असे 93 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

जिह्यातील 30 मतदान केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत पार पडणार असून, याकामी सहकार विभागाने 450 कर्मचाऱयांची नियुक्ती केली आहे. झालेल्या मतदानाची मतमोजणी सोमवारी करण्यात येणार असून, यासाठी 250 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. सकाळी 8 वाजता मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. सायंकाळी निकाल घोषित होण्याची अपेक्षा आहे. रविवारी 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर त्या मतपेटय़ा सिलबंद करून स्ट्राँगरुममध्ये ठेवण्यात येणार आहे. अमरज्योत मंगल कार्यालयात स्ट्राँगरुमची सोय करण्यात आली आहे.

शिक्षक बँकेबरोबरच शिक्षक विकास मंडळाच्या निवडणुकीसाठी आजच मतदान पार पडणार आहे. यासाठीही 4 पॅनेल्स मैदानात असून, एकूण 18 जागांसाठी 72 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.