
सामना प्रतिनिधी। नगर
नगरमध्ये पाण्याची चोरी रोखण्यासाठी प्रशासनाने धडक कृती कार्यक्रम हाती घेतला आहे. जो कोणी पाणी चोरीचा प्रयत्न करेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार. असा इशारा देत भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकांमध्ये उपकार्यकारी अभियंता, शाखाधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे.
निळवंडे धरणाची क्षमता 8 हजार 320 दशलक्ष घनफूट एवढी आहे. या धरणामध्ये शनिवारी (5 डिसेंबर) सकाळी सहा वाजता 4 हजार 602 दशलक्ष घनफूट एवढा पाणीसाठा होता. यापैकी उपयुक्त पाणीसाठा 4 हजार 346 दशलक्ष घनफूट एवढा असून या धरणातून शनिवारी सकाळी 1 हजार 700 क्युसेक वेगाने शेती व पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. या आवर्तनासाठी अंदाजे 2 हजार 500 दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर होणार आहे. कमीतकमी पाण्यात हे आवर्तन करायचे असल्याने पाणीचोरी रोखण्यासाठी दोन भरारी पथके नेमण्यात आली आहेत. या भरारी पथकांकडून पाणीचोरी करणार्यांसोबतच त्यांना साथ देणार्या कर्मचार्यांवर सुद्धा कारवाई केली जाणार आहे.
निळवंडेतून चौथे आवर्तन
निळवंडे धरणातून यापूर्वी खरिपासाठी एक आणि रब्बीसाठी एक अशी दोन आवर्तने सोडण्यात आली होती. तसेच समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार भंडारदरा-निळवंडे धरणातून ’जायकवाडी’ला 3.85 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे जायकवाडी धरणासाठी निळवंडे धरणातून एक आवर्तन देण्यात आले होते. आता शनिवारपासून शेती व पिण्यासाठी आवर्तन सुरू करण्यात आले असून हे साधारण पंचवीस दिवस चालणार आहे. त्यानंतर उन्हाळ्यामध्ये पुन्हा एक आवर्तन देण्यासाठी नियोजन केले जाणार आहे.
































































