जिल्ह्यातील 237 पाणी योजना बंद , टँकरला वाढली मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। नगर

ऐन थंडीच्या डिसेंबर महिन्यात जिल्ह्यातील पाण्याचे स्त्रोत कोरडे पडत चालले आहेत. यामुळे जिल्ह्यातील तब्बल 237 पाणी योजना बंद झाल्या आहेत. जिल्हयात एकच खळबळ उडाली असून जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न आता ऐरणीवर आला आहे.

गेल्या वर्षापेक्षा यंदा कमी पाऊस झाल्याने नगर जिल्ह्याला दुष्काळाचे चटके जाणवू लागले आहेत. जिल्ह्यात खरिपापाठोपाठ रब्बी हंगाम वाया गेला. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेले आहेत. एकिकडे पीक पाणी वाया गेल्याने शेतकर्‍यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले असताना दुसरीकडे मात्र ग्रामीण भागात पाण्याची टंचाई आणखी तीव्र झाली. डिसेंबर महिन्यातच टँकरची संख्या 300 वर गेली आहे. गेल्या वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे टॅँकरची संख्या अतिशय कमी होती. यंदा मात्र ऑक्टोबर महिन्यापासून जिल्ह्यात टंचाईची स्थिती निर्माण झाली. नोव्हेंबर महिन्यापासून प्रामुख्याने जिल्ह्यात टँकरच्या संख्येत वाढ झाली. पाण्याचे टँकर सुरू असले तरी अनेक जिल्ह्यांच्या काही भागांत अजूनही टँकरची प्रतीक्षा आहे. सध्या नगर जिल्ह्यात 303 टँकर सुरू असून, एक लाखापेक्षा अधिक नागरिकांना या टँकरच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे.
एकीकडे टँकरला मागणी वाढत असतानाच दुसरीकडे ऐन थंडीच्या कडाक्यात विहीरी कोरडे पडल्याने 237 पाणी योजना बंद पडल्या आहेत. प्रामुख्याने पाथर्डी तालुक्यातील तब्बल शंभर पाणी योजना बंद पडल्या आहेत.

त्या खालोखाल पारनेर तालुक्यातील 42, संगमनेर तालुक्यातील 30, शेवगाव तालुक्यातील 22, कर्जत तालुक्यातील 13, नगर तालुक्यातील 13, जामखेड 7, श्रीगोंदे 6,कोपरगाव 3 व राहुरी तालुक्यातील 1 अशा पाणी योजना बंद झाल्या आहेत. नगर जिल्ह्यात 44 प्रादेशिक पाणीपुरवठा योजना असून 1 हजार 417 स्वतंत्र नळपाणी योजना आहेत. कमी पावसाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने नगर जिल्ह्यातील 11 तालुके दुष्काळी म्हणून जाहीर केले आहेत. दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने या तालुक्यात दुष्काळी उपाययोजना सुरू केल्या असून, या उपाययोजनातूनच जिल्ह्यात पाणी टँकर सुरू झालेले आहेत.

जानेवारी या नवीन वर्षापासून जिल्ह्यात आणखी पाणी टँकर वाढण्याची शक्यता असून, दुष्काळामुळे प्रशासनाने नवे स्त्रोत शोधण्याचे काम हाती घेतले. दरवर्षीप्रमाणे यंदाही दुष्काळाचा सर्वाधिक फटका पाथर्डी, पारनेर, कर्जत जामखेड या तालुक्यांना बसणार आहे. एकीकडे पाणी टंचाई तर दुसरीकडे जिल्ह्यात चार्‍याची देखील टंचाई निर्माण होऊ लागली. कमी पावसामुळे यंदा उसाचे क्षेत्र घटल्याने उसाचे वाढे देखील बाजारात उपलब्ध होत नसल्याने पशुपालक अडचणीत आले आहेत. त्यामुळे बाजारात चार्‍याची टंचाई निर्माण झाली असून चार्‍याचे भाव देखील कडाडले आहेत. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने चार्‍याचे नियोजन केले असले तरी हा चारा फेब्रुवारी महिन्यातच उपलब्ध होणार असल्यामुळे सध्या काय करायचे असा मोठा प्रश्‍न पशुपालकास समोर उभा आहे. त्यातच पाणी योजना बंद झाल्यामुळे ऐन थंडीत लाखो ग्रामस्थांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. पाण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामीण भागातून होत आहे.

बुर्‍हाणनगर योजना दीड महिन्यात दोन वेळा बंद

नगर तालुक्यातील बुर्‍हाणनगर पाणी योजना दोन वेळा केवळ थकीत वीज बिल न भरल्यामुळे बंद पडली होती. दहा दिवसांपूर्वीच ही योजना पुन्हा सुरू झाली आहे. उन्हाळ्यात थकीत वीज बिलामुळे पुन्हा ही पाणी योजना बंद पडण्याची शक्यता आहे. या प्रकाराने मात्र योजनेवरील लोकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत.