
मुंबई-गोवा महामार्गालगत असलेले, हजारो नागोठणेकरांसह अपघातग्रस्तांना जीवनदायी ठरणारे नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र आमडोशी येथील सुप्रिम पेट्रोकेमिकल्समध्ये हलवण्याच्या प्रस्तावावर फुली पडल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नागोठणेतील योग्य जागेचा शोध जिल्हा व आरोग्य प्रशासन घेत असून कचेरी शाळेच्या इमारतीला सर्वाधिक पसंती दिली आहे.
नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र हे मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातग्रस्तांना जीवदान देणारी अत्यंत महत्त्वाची आरोग्य सेवा आहे. आमेटे ते कोलाडदरम्यान अपघातातील जखमींना याच प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीच्या उपचारासाठी आणले जाते. नागोठणेतील वाढते औद्योगिकीकरण त्यामुळे झपाट्याने वाढणारी लोकसंख्या पाहता सर्वसामान्य नागरिकांची उपचाराची भिस्त याच आरोग्य केंद्रावर आहे. परिसरातील खेडेगावे व आदिवासी पाड्यांना उपचार व प्रसूतीसाठी हे केंद्र एकमेव आधार आहे.
‘सुप्रिम’ला भाडे देणार
या आरोग्य केंद्राच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा प्रस्ताव बांधकाम विभागाकडे सादर करण्यात आल्याचे सांगत हे अख्खे आरोग्य केंद्र आमडोशी गावातील सुप्रिम पेट्रोकेमिकल्सच्या आवारात हलवण्याचे आदेशच जिल्हा आरोग्य अधिकारी प्राची नेहुलकर यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रियंका साळुंखे व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले. तालुका वैद्यकीय अधिकारी साळुंखे यांनीही हे आरोग्य केंद्र सुप्रिम पेट्रोकेमिकल्सच्या भाड्याच्या जागेत हलवता येणार असल्याचे मत नोंदविले होते. मात्र या प्रस्तावाला स्थानिक स्तरावर विरोध झाल्याची माहिती आहे.




























































