
कोरोनाची दुसरी लाट वेगाने फैलावत असून या लाटेने नागपूरमध्ये थैमान घातले आहे. कोरोना रुग्णांचे दररोजचे आकडे पाहता नागपुरात पालिका प्रशासन अस्तित्वात आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. नागपूरकर एवढय़ा मोठय़ा गंभीर संकटाला तोंड देत असताना देवेंद्र फडणवीस व पेंद्रीय मंत्री नितीन गडकरी कुठे आहेत, असा प्रश्न काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.
नागपूरच्या जनतेला भगवान भरोसे सोडून देवेंद्र फडणवीस पंढरपूरमध्ये प्रचारसभा घेत सरकारचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करू अशा वल्गना करत आहेत; परंतु कोरोनाने इकडे नागपूरचाच ‘करेक्ट कार्यक्रम’ करून ठेवला आहे त्याचे काय? गडकरी यांनी त्यांच्या पीएसाठी कायद्याच्या बाहेर जाऊन त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले असे सांगतात मग नागपूरच्या जनतेसाठी ते तत्परतेने काम करताना का दिसत नाहीत, असा सवाल लोंढे यांनी पत्रकार परिषदेत केला.
कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात नागपूर पालिकेला अपयश आल्याने उच्च न्यायालयानेही त्यांच्यावर गंभीर ताशेरे ओढले आहेत. शहरात 10 झोन असताना या झोनमध्ये ट्रेसिंगचे काम व्यवस्थित होत नाही. तापाच्या रुग्णांना पॅरासिटेमॉलच्या गोळ्या देऊन पिटाळले जात आहे. पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे नागपूरमधील परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चालली आहे. आताही पालिकेला जाग आली नाही तर नागपूरमध्ये कोरोनाचा उद्रेक होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
पालिकेची आरोग्य व्यवस्था कोलमडली
नागपूरमधील पालिकेची आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे. होम क्वारंटाइन पेशंटवर महापालिकेचे नियंत्रण नाही. त्यातील अनेकजण शहरात बिनधास्त फिरून कोरोना स्प्रेडरचे काम करत आहेत. केटी नगरच्या रुग्णालयात ऑक्सिजन बेड्सची व्यवस्थाच नाही. 400 बेड्सच्या इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये 200 बेड्सच वापरात आहेत. मनुष्यबळ नसताना महापौर 500 बेड्सचे हॉस्पिटल उपलब्ध करू अशा थापा मारत असल्याची टीका लोंढे यांनी केली.



























































