
नायरमध्ये डॉक्टरांसाठी बांधण्यात आलेल्या नव्या अद्ययावत हॉस्टेल इमारतीत उद्यापासून निवासी डॉक्टरांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यामध्ये कॅण्टीन, जीम, लॅब, क्लासरूम, इनडोअर गेम, जीम आणि सुरक्षा आदी सुविधा डॉक्टरांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे राहण्यासाठी वणवण करणाऱया डॉक्टरांना हक्काचे निवासस्थान उपलब्ध झाले आहे.
89 वर्षांनी मिळाले हक्काचे हॉस्टेल
- नायरमधील निवासी डॉक्टरांना गेल्या 89 वर्षांपासून कामाच्या ठिकाणीच हक्काच्या आणि सुविधायुक्त हॉस्टेलची प्रतीक्षा होती. हॉस्टेलच्या कमतरतेमुळे या विद्यार्थ्यांना करीरोड, भायखळय़ातील ‘एसआरए’ प्रोजेक्टमध्ये राहण्याची व्यवस्था करावी लागत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती, मात्र ही प्रतीक्षा आता संपली आहे.
- सद्यस्थितीत काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने इंटर्न आणि पीजी स्टुडंट राहण्यासाठी येणार आहेत. तर इतर विद्यार्थी त्यांच्या परीक्षा झाल्यानंतर या ठिकाणी राहण्यासाठी येणार आहे. पुढील दहा दिवसांत सर्व विद्यार्थी या ठिकाणी राहण्यासाठी येणार आहेत. 2018 पासून या हॉस्टेलचे काम सुरू होते.
पालिकेच्या मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात 245 विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी हे हॉस्टेल बांधण्यात आले आहे. अकरा मजली ही इमारत आहे. यामध्ये सात ते अकराव्या मजल्यापर्यंत विद्यार्थ्यांना राहण्याची सुविधा करण्यात येणार आहे. या हॉस्टेलचा शुभारंभ आज मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. तर उद्यापासून विद्यार्थ्यांना राहण्यासाठी हॉस्टेल खुले करण्यात येईल, अशी माहिती पालिका रुग्णालय संचालक डॉ. नीलिमा अंद्राडे यांनी दिली. या हॉस्टेलमध्ये बेसमेंटमध्ये पार्किंग व्यवस्था तर सहाव्या मजल्यापर्यंत क्लासरूम, लॅब, बोर्ड रूम, विद्यार्थ्यांसाठी कॅण्टीन, ऑफिस, सेमिनार हॉल, बिन्स चेंबर अशा सुविधा करण्यात आल्या आहेत. या हॉस्टेलसाठी पालिकेने सुमारे 130 कोटी रुपयांचा खर्च केला आहे.



























































