
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत काँग्रेस का बोलत नाही असा सवाल करणाऱया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार टोला लगावला. फडणवीस यांनाच हप्तेखोरीचा मोठा अनुभव आहे. त्यांनी पाच वर्षांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला किती वाटा दिला? असा सवाल करतानाच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.
नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांच्या आरोपांवर पलटवार केला. वसुली कशी करतात? वसुलीतील वाटा किती असतो? आणि त्याचे वाटप कसे केले जाते? याचा दांडगा अनुभव विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना असून ते त्यांचा अनुभव कथन करत आहेत. पाच वर्षे सत्तेत असताना मंत्रालयात संघाचे कार्यकर्ते सर्व विभागांत कसे घुसवले होते, ते किती वसुली करत होते व त्यातला किती वाटा संघाला जात होता याची चौकशी करण्याची मागणी आपण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून करणार आहोत, असे पटोले म्हणाले.
सरकारला बदनाम करण्यासाठी कधी अधिकारी, तर कधी राजभवनाचा वापर
फडणवीस यांनी सत्तेत असताना रश्मी शुक्लांसारख्या अधिकाऱयांना हाताशी धरून कोणाला किती वाटा द्यायचा याचा मोठा अनुभव मिळवलेला आहे. भाजपने आयएएस, आयपीएस अधिकाऱयांवर पेंद्र सरकारचा दबाव आणून सत्तेचा गैरवापर केला. आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम भाजप करत आहे, परंतु महाराष्ट्राची जनता त्यांचा हा खेळ ओळखून आहे. फडणवीस हे स्वतःच जज असल्याच्या भूमिकेत वावरत आहेत. सरकारला बदनाम करण्यासाठी कधी अधिकारी तर कधी राजभवनच्या माध्यमातून भाजपचे हे उद्योग सुरू आहेत. फडणवीस हे सर्वात मोठे खोटारडे असून ते विधिमंडळातसुद्धा खोटे बोलतात, असा घणाघाती हल्लाही त्यांनी केला.
परमबीर सिंग प्रिय कसे?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर कालपर्यंत हेच भाजपवाले टीका करत होते. आता ते त्यांचे प्रिय कसे झाले? खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली. त्याचा एफआयआर दाखल करण्यातही परमबीर सिंग यांनी टाळाटाळ केली. त्यांची भूमिका संशयास्पद आहे. सध्या सुरू असलेल्या प्रकरणाची हायकोर्टाचे न्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करावी, अशी काँग्रेसची मागणी आहे, असे ते म्हणाले.






























































