मनपा – पोलिसांत ताळमेळ नाही, नांदेडकरांचे प्राण कंठाशी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना रुग्णांमध्ये झालेली बेसुमार वाढ, काळीज चर्र करणारा मृत्यूदर आणि लोकांची बेपर्वाई यामुळेच नांदेडची परिस्थिती भयावह झाली आहे. कडक निर्बंध असूनही बाहेर फिरणारांवर प्रशासनाचा कोणताही वचक नाही. मनपा आणि पोलीस प्रशासनात कोणताही ताळमेळ नसल्यामुळे नांदेडकरांचे प्राण मात्र कंठाशी आले आहेत.

फेब्रुवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली. त्यानंतरही प्रशासन उपाययोजना करण्याऐवजी सुस्तच होते. चोरपावलाने कोरोनाने नांदेडला विषारी विळखा घातला. गोदाकाठावर अहोरात्र चिता धडधडू लागल्यानंतर प्रशासनाचे डोळे उघडले. मात्र उपायांच्या नावाने शंखच होता. देशातील सर्वाधिक संसर्ग असलेल्या दहा शहरात नांदेडचे नाव झळकल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दोन वेळा फेसबुक लाईव्ह करून दोन वेगवेगळ्या अधिसूचना जारी केल्या. कोरोना नियमांचे पालन करण्याविषयी या सूचना होत्या. जिल्हाधिकाऱ्यांनी कळकळीने केलेल्या आवाहनाला नांदेडकरांनी गोदापात्रात बुडवले.

रस्तोरस्ती असलेल्या फळांच्या गाड्या, दिवसरात्र उघडी असलेली किराणा दुकाने, बंदी घालण्यात आलेली असतानाही मागच्या दरवाजाने सुरू असलेले व्यवहार यामुळे गेला महिनाभरात नांदेडची रुग्णसंख्या एकदाही हजाराच्या खाली आलेली नाही. मनपाला आपल्या नागरिकांशी काहीही देणेघेणे नाही. कारवाईचा देखावा करून मनपाने हात वर केले आहेत. 21 फेब्रुवारीला जिल्ह्यात 23149 रुग्णसंख्या होती, तर मृत्यू 592 होते. 21 एप्रिलला हा आकडा 71791 झाला आणि मृत्यूची संख्या 1322 वर गेली. यापैकी 55 हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले हीच समाधानाची बाब.

जानेवारी व फेब्रुवारीत झालेले लग्नसोहळे, विदर्भातून आलेल्या वऱ्हाड्यांनी नांदेडकरांचे प्राण संकटात टाकले. मंगल कार्यालयावर निर्बंध असताना शहरी आणि ग्रामीण भागात मनपा, नगरपंचायत व ग्रामपंचायतीने बघ्याची भूमिका घेतली. त्याचे परिणाम आता सर्वसामान्य भोगत आहेत.

मनपापेक्षा वाईट अवस्था पोलीस प्रशासनाची आहे. 29 मार्च रोजी झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांचे मनोबलच खचून गेले आहे. कारवाई केली तर अंगावर शेकण्याच्या भीतीने चौकाचौकात पोलीस नुसते बसून असतात. आठ दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी विनाकारण फिरणारांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले. मात्र एक दिवस थातूरमातूर कारवाई करून या आदेशाला मूठमाती देण्यात आली. होम आयसोलेशनमध्ये असलेल्यांवर कोणतेही नियंत्रण नाही.

आगामी तीन आठवडे महत्त्वाचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी ओरडून सांगितले आहे. परंतु नांदेडकरांना त्याचे कोणतेही गम्य नाही. शहरी भागात असलेल्या कोरोनाने आता ग्रामीण भागात शिरकाव केला आहे. ग्रामीण भागात कोरोनाने थैमान घातल्यास जिल्ह्यात हाहाकार उडेल. त्यामुळे वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे.