
सामना ऑनलाईन, नांदेड
नांदेडच्या नव्या महापौर निवडीसाठी 1 जून रोजी निवडणूक होणार आहे. काँग्रेसने या पदासाठी दिक्षा कपिल धबाले यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर भाजपने या पदासाठी बेबीताई जनार्दन गुपिले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसचे नांदेड महानगरपालिकेमध्ये 74 नगरसेवक आहेत. त्यामुळे दिक्षा धबाले यांचा विज निश्चित मानला जात आहे.
महापालिकेत काँग्रेसचे 74 नगरसेवक निवडून आल्यानंतर जास्तीत जास्त नगरसेवकांना महापौरपदाचा बहुमान देता यावा यासाठी महापौर पदाचा कालावधी सव्वा वर्षाचा ठरविण्यात आला होता. यानुसार शीला किशोर भवरे यांनी महापौरपदाचा राजीनामा दिला होता. यामुळे नव्या महापौर पदाच्या निवडीची प्रक्रिया विभागीय आयुक्तांनी जाहीर केली होती.
महापौर पदाच्या शर्यतीत काँग्रेसकडून ज्योती सुभाष रायबोळे, पूजा पवळे, गंगाबाई कदम यांचीही नावे होती मात्र ही उमेदवारी दिक्षा कपिल धबाले यांना देण्यात आली. काँग्रेसचे निरीक्षक असलेल्या अमर राजूरकर यांनी 30 मे रोजी नगरसेवकांची बैठक घेतली होती. या बैठकीपूर्वी ज्योती रायबोले यांचे नाव या उमेदवारीसाठी आघाडीवर होते. मात्र या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्या नगरसेवकाच्या वॉर्डातून काँग्रेसला आघाडी मिळाली आहे हे तपासण्यात आले. यामध्ये प्रभाग क्र.१८ खडकपूरा,देगावचाळ या प्रभागातून लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना 5 हजारांचे मताधिक्य मिळाल्याचे दिसले. यामुळे ही उमेदवारी दिक्षा यांना देण्याचं निश्चित करण्यात आलं.
दिक्षा धबाले यांनी गुरुवारी दुपारी दिड वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर दुपारी दोन वाजता भाजपच्या उमेदवार बेबीताई गुपिले यांनीही अर्ज दाखल केला. या पदासाठी हे दोनच अर्ज प्राप्त झाल्याने महापौरपदाची निवडणूक काँग्रेस विरूद्ध भाजप अशी थेट होणार आहे. नांदेड महानगरपालिकेमध्ये भाजपचे 5 नगरसेवक आहेत तर शिवसेना आणि अपक्ष असे प्रत्येकी 1 नगरसेवक आहेत.































































