नाशिक – सुरगाणा तालुक्यात गॅस्ट्रोचे थैमान, पाच जणांचा मृत्यू

67

सामना ऑनलाईन । नाशिक

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातल्या राहुडे गावामध्ये गॅस्ट्रोने थैमान घातले आहे. गॅस्ट्रोची लागण झाल्याने आत्तापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर जवळपास २०० जणांना याची बाधा झाली आहेत. गावातील विहिरिचे दूषित पाणी प्यायल्याने ही लागण झाल्याचे वैद्यकीय तपासामध्ये उघड झाले आहे.

राहुडे गावामध्ये असलेल्या एकाच विहिरीवर संपूर्ण गाव अवलंबून आहे. नुकत्याच झालेल्या पहिल्या पावसात या विहिरीत गावातले सगळे सांडपाणी मिसळले गेले आणि विहिरीचे पाणी दूषित झाले. या दूषित विहिरीतील पाणी प्यायल्यामुळे गावातल्या २०० जणांना अचानक उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला. यातील पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर तालुका वैद्यकीय अधिकारी आणि डॉक्टरांचे एक पथक राहुडे गावात दाखल झाले आहे. ८०० लोकसंख्या असलेल्या या गावात जवळपास २०० जण गॅस्ट्रोची बाधा झाल्यामुळे गावातल्या शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. या शाळांमध्ये सध्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कम्प लावण्यात आले असून रुग्णावर उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या