सोनिया गांधी यांना ईडीचे नव्याने समन्स, नॅशनल हेराल्ड प्रकरणात 23 जूनला जबाब नोंदवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

12 वर्षांपूर्वीच्या जुन्या नॅशनल हेराल्ड प्रकरणात ऑक्टिव्ह झालेल्या ईडीने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना शुक्रवारी नव्याने समन्स बजावले. कोरोनाची लागण झाल्यामुळे सोनिया गांधी 8 जूनला ईडीपुढे हजर राहू शकल्या नव्हत्या. त्यावेळी सोनिया यांनी ईडीकडे तीन आठवडय़ांची मुदत मागितली होती. मात्र जबाब नोंदवण्यासाठी घाईवर आलेल्या ईडीने सोनिया यांना त्याआधीच 23 जूनला हजर राहण्यास सांगितले आहे.

नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित 2010 मधील कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात ईडीने पुन्हा चौकशी सुरू केली होती. वास्तविक, या प्रकरणाची फाईल 2015 मध्ये बंद करण्यात आली होती. त्यानंतर आता ईडीने पुन्हा संबंधित प्रकरणाची फाईल वर काढून गांधी कुटुंबीयांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला आहे. ईडीने काही दिवसांपूर्वीच सोनिया गांधी व त्यांचे पुत्र, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना समन्स बजावले होते. राहुल यांना 8 जूनला तपास यंत्रणेला हजर राहण्यास सांगितले होते. मात्र ते सध्या विदेशात असल्यामुळे त्यांनी मुदतवाढ मागितली. त्यानुसार त्यांचा जबाब 13 जूनला नोंदवला जाणार आहे, तर ईडीने सोनिया यांना नव्याने समन्स जारी करीत 23 जूनला दिल्लीतील कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. नॅशनल हेराल्डमधील कथित गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक अफरातफर कायद्याखाली सोनिया गांधी यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे.

राहुल यांच्या हजेरी वेळी काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन
राहुल गांधी यांचा जबाब 13 जूनला नोंदवण्यात येणार आहे. त्यांच्या हजेरीदरम्यान जोरदार शक्तीप्रदर्शन करून ईडीच्या कारवाईला विरोध करण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. भाजप ईडीच्या माध्यमातून विरोधकांना टार्गेट करीत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.