भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांची प्रकृती खालावली असून त्यांना मंगळवारी सकाळी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इंद्रप्रस्थ येथील अपोल रुग्णालयातील न्यूरोलॉजी विभागात त्यांना दाखल करण्यात आले आहे. न्यूरो सर्जन डॉ. विनीत सुरी यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत आहे.
सध्या आडवाणी यांची प्रकृती स्थिर असून तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवत आहेत, असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. आडवाणी सध्या 96 वर्षांचे असून वयोमानानुसार त्यांची प्रकृती खालवली आहे. काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आडवाणी यांना यावर्षी भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.