अमेरिकेतही रामललाच्या स्थापनेची उत्सुकता; ‘टाइम्स स्क्वेअर’वर लाईव्ह दाखवला जाणार सोहळा

अयोध्येत बांधण्यात आलेल्या राम मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते 22 जानेवारी रोजी उद्घाटन होणार आहे. याच दिवशी प्रभू रामाच्या मूर्तीचा अभिषेक आणि प्राणप्रतिष्ठा होईल. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. 22 जानेवारीचा हा सोहळा देशातच नाही, तर अमेरिकेतही लाईव्ह दाखवला जाणार आहे. न्यूयॉर्कमधील ‘टाइम्स स्क्वेअर’वर याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

देशातील सर्व राज्यांमध्ये प्रसारित होण्याबरोबरच परदेशातील विविध भारतीय दूतावासांमध्येही रामललाच्या प्राण प्रतिष्ठेचा सोहळा लाईव्ह दाखवला जाणार आहे. अयोध्येतील राम मंदिराचा अभिषेक सोहळा न्यूयॉर्क शहरातील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर थेट प्रक्षेपित केला जाईल. भाजपने राम लल्लाच्या अभिषेक सोहळ्याचे देशभरातील बूथ स्तरावर थेट प्रक्षेपण करण्याची योजना आखली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. अयोध्येतील रामललाच्या अभिषेकासाठी वैदिक विधी 16 जानेवारीपासूनच सुरू होईल. 22 जानेवारीच्या सोहळ्याला सुमारे 60,000 लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.