निसर्गाच्या मदतीने उद्योग बहरला

>> स्नेहल केसरकर

औषधी उटणं, गुलाब, चंदन, वाळय़ाचे साबु, आयुर्वेदिक लेप. स्नेहल केसरकर हे सर्व निसर्गाच्या मदतीने तयार करतात.

निसर्ग आणि नैसर्गिक साधनांचा दैनंदिन जीवनातला वापर हा माझ्यासाठी फारच जिव्हाळ्याचा विषय. माझा जन्म आणि शिक्षण कोल्हापुरात झाला. माझे शिक्षण एमएससी कॉम्प्युटर सायन्स विषयात झालं. लग्नानंतर मुंबईला आले. त्यावेळी घरच्या जबाबदारीमुळे नोकरी करता आली नाही. काहीतरी वेगळं करावं आणि नैसर्गिक वस्तूंपासून बनवलेलं असावं याकरिता साबण, उटणं, नारळाच्या शेंडीचा स्कर्ब, शिकेकाई मसाला तयार केलं. वाढदिवस आणि सणानिमित्त या वस्तू सर्वांना भेटवस्तू म्हणून जवळच्या नातेवाईकांना या वस्तू दिल्या. तेव्हा त्यांनी वापरल्यावर त्यांच्या प्रतिक्रिया माझ्याकरिता प्रोत्साहन देणाऱया ठरल्या. यातूच माझा ‘गौराई लघुउद्योग प्रकल्प’ सुरू झाला.

या प्रकल्पाद्वारे मी 25 पेक्षा जास्त दर्जेदार उत्पदानं तयार केले आहेत. यामध्ये शिकेकाई, लाकडी कंगवा, आयुर्वेदिक फेसपॅक, गुलकंद, मोरावळा, विविध सुगंधित अगरबत्ती, धूपबत्ती या उत्पादनांचा यामध्ये समावेश आहे. कच्च्या मालाचा दर्जा, आपली बनवण्याची प्रक्रिया, वस्तूंचे आकर्षक वेष्टन या सगळ्याचा दर्जा उत्तमच कसा राखला जाईल यासाठी माझा प्रयत्न असतो. मिळालेली मागणी वेळेत पोहोचवण्यासाठी मी विशेष काळजी घेते. मागणी आल्यावरच उत्पादनं बनवते. मोरावळा, गुलकंद, धूपकाडी, केशतेल ही उत्पादने उन्हाळ्यात तयार करावी लागतात. उत्पादनाचा कायमच उत्तम कसा राखता येईल हेच आमचे ध्येय आहे. उद्योगात यामध्ये सातत्या कसे येईल हे मी पाहाते.

मी तयार केलेल्या वस्तूंचे वैशिष्टय़ म्हणजे त्यामध्ये 70 ते 80 टक्के नैसर्गिक पदार्थांचा वापर असतो. त्यामध्ये नारळपाणी, नारळाची मलई, गोमूत्र, शेण, गाईचे तूप इत्यादींचा उपयोग करून उत्पादन तयार केले जाते. यामुळे त्वचेला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. माझ्याकडील उत्पादनांची मागणी वाढावी, म्हणून मला माझ्या उत्पादनांची कधी जाहिरात करावी असं वाटलं नाही, मात्र ग्राहकांना उत्पादनं आवडत आहेत, त्यामुळे तोंडी जाहिरात होते. म्हणून व्यवसाय हळूहळू छान वाढत चाललाय.

दिवाळीनिमित्त सुगंधी उटण्याची लहान लहान पाकीट तयार करून आम्ही सुरुवातीला शेजारील परिसरात मोफत वाटली. त्यानंतर काही दिवसांनी शेजारच्या इमारतीतील काकी आल्या आणि त्यांनी मला मिठीच मारली. त्या म्हणाल्या, आतापर्यंत खूप उटणी वापरली पण तुझ्या उटण्याची गोष्टच वेगळी. चार-पाच दिवसांत घामाचा वास येणंच बंद झालं. त्यावेळी मला पहिल्यांदा त्यांच्याकडून शंभर ग्रॅम उटण्याची ऑर्डर मिळाली. याचमुळे मला लग>ाकरिता एका काकींकडून सुगंधी हळद बनवण्याची मागणी आली. यावेळी सात-आठ प्रकारच्या सुगंधी हळदीची मिश्रणं मी बनवली आणि त्यानंतर तीन दिवसांच्या अभ्यासातून एक मिश्रण फायनल झालं. त्या लग्नात गेलेल्या हळदीमुळे आजपर्यंत खूप गिऱहाईक वाढले आहेत. त्यामुळे आमच्या उत्पादनात भर पडली आहे. ही हळद चुरचुरत नाही. त्वचेला सुगंधी, चमकदार आणि टवटवीत करते. माझे पती डॉ. दीपक केसरकर यांच्या मदतीने ही सर्व उत्पादनं मी तयार करते.

बचत गटातील महिलांनी एकत्र येऊन कम्पोस्ट खत निर्मिती, गांडुळ खळ निर्मिती आणि लुप्त होत असलेला आजीबाईंचा बटवा पुन्हा जिवंत करण्यासाठी काय नवीन करता येईल या विषयावर सध्या मी काम करत आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या