काँग्रेसने मला माझी जागा दाखवली, सिद्धू भडकला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । अमृतसर

भाजपला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये आलेले नवज्योत सिंग सिद्धू यांचे आता काँग्रेसमधील वजन देखील कमी होऊ लागले आहे. गुरुवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पंजाबमधील रॅलीच्या वेळी भाषण देणाऱ्यांच्या यादीत नवज्योत सिंग सिद्धू यांचे नाव नसल्याने ते नाराज झाले आहेत. त्याबाबत बोलताना त्यांनी ‘काँग्रेसने मला माझी जागा दाखवली’ असे हताश वक्तव्य केले आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात पाकिस्तान विरोधात संताप व्यक्त होत असताना सिद्धूने पाकिस्तानशी शांतता चर्चा करण्याची मागणी केली होती. त्यानंतर नेटकऱ्यांनी देखील त्यांच्या विरोधात कॅम्पेन चालवत कलर्स वाहिनीला सिद्धू यांची कपिल शर्माच्या शो मधून हकालपट्टी करण्यास भाग पाडले होते. त्यामुळे देशभरात सध्या सिद्धूविरोधी वातावरण असल्याने लोकसभा निवडणूकीच्या प्रचारापासून काँग्रेसने सिद्धूला लांब ठेवले आहे. लोकसभेच्या स्टार प्रचारकांच्या यादीत देखील त्यांचे नाव नसल्याचे समजते.

‘कदाचित राहुल गांधीच्या रॅलीमध्ये भाषण करण्याइतपत योग्यतेचा मी नसेल त्यामुळे मला संधी देण्यात आली नाही. तसेच माझ्याकडे प्रचाराची धुरा देखील सोपविण्यात आलेली नाही. मला बोलवावे की नाही हे माझ्या हातात नाही. पण या प्रसंगाने मला माझी जागा दाखवून दिली आहे’, असे सिद्धूनैे सांगितले.