
‘सेक्रेड गेम’, ‘सीरियस मॅन’सारख्या हिट वेब सीरिजमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडणारा बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीने यापुढे ओटीटीवर काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीनने हा निर्णय जाहीर केला आहे, त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
नवाजुद्दीन म्हणाला, सध्या ओटीटीवरील शो एकतर पाहण्याच्या लायकीचे नाहीत किंवा कशाचे तरी सिक्वेल आहेत. मी ‘सेक्रेड गेम’साठी ‘नेटफ्लिक्स’सोबत काम करायला सुरुवात केली तेव्हा डिजिटल मीडियाविषयी खूप उत्सुकता होती. नवीन लोकांना संधी दिली जात होती. आता त्यातील ताजेपणा निघून गेला आहे. मला ओटीटीवरील शो पाहणेही शक्य होत नसेल तर त्यात मी काम कसे करू, असा सवाल त्याने उपस्थित केला आहे.
‘कंटेंट’ हाच ‘स्टार’
स्टार व्यवस्थेने मोठय़ा पडद्याला खाऊन टाकलेय. आता आमच्यासारखे तथाकथित ओटीटी स्टार मोठय़ा पैशांची मागणी करतात. कंटेंट हाच निर्णायक आहे हे ते विसरले आहेत. स्टारचे राज्य असायचे तो काळ निघून गेला आहे. डिजिटल मीडियाच्या आधी बॉलीवूडचे बडे स्टार देशभरातील 3 हजार स्क्रीनवर चित्रपट रिलीज करायचे, त्यामुळे प्रेक्षकांपुढे त्यांचे चित्रपट पाहण्याशिवाय पर्याय नसायचा. आता अनेक पर्याय खुले झाले आहेत.
ओटीटी ‘डम्पिंग ग्राऊंड’ बनलंय!
बडय़ा प्रॉडक्शनसाठी ओटीटी प्लॅटफॉर्म धंदा बनला आहे. अनेक अनावश्यक शोसाठी ओटीटी ‘डम्पिंग ग्राऊंड’ बनलंय. बडय़ा निर्मात्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवरील मोठय़ा लोकांशी फायद्याचे करार केले आहेत. निर्मात्यांना अमर्यादित पंटेंट तयार करण्यासाठी मोठी रक्कम मिळते, मात्र अमर्यादित पंटेंटने गुणवत्तेला मारले आहे, अशी खंत त्याने व्यक्त केली.



























































