शरद पवार मंगळवारी पंढरपूर दौऱ्यावर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्या मंगळवारी पंढरपूर दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील आणि हभप रामदास महाराज कैकाडी (जाधव) या तीन दिग्गज व्यक्तींचे कोरोनामुळे निधन झाल्याने पवार हे या तिन्ही सहकाऱ्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

माजी आमदार व सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांनी अनेक वर्षे पवार यांच्या नेतृत्वाखाली काम केले. राष्ट्रवादी काँग्रेसचेच्या स्थापनेनंतर अनेक वर्षे पवार यांचे आणि परिचारक यांचे  जिव्हाळ्याचे संबंध होते. पवार यांचे जिल्ह्यातील विश्वासू सहकारी म्हणून परिचारक यांची ओळख होती. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत परिचारक यांनी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवली, परंतु तरीही अनेक वर्षे मिळून काम केलेले असल्याने दोन्ही नेत्यांमधील जिव्हाळ्याचे संबंध कायम होते.

परिचारकांच्या निधनापूर्वी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील यांचे आणि त्यानंतर नुकतेच रामदास महाराज कैकाडी यांचे ही निधन झाले. राजूबापू पाटील यांचे वडील (कै.) यशवंतभाऊ पाटील यांच्या पासून पवार यांचे पाटील घराण्याशी संबंध होते. राजू बापू पाटील हेदेखील पवार यांचे कट्टर समर्थक होते.

रामदास महाराज कैकाडी यांचाही पवार यांच्याशी चांगला स्नेह होता. पंढरपूर मधील परिचारक, पाटील आणि कैकाडी (जाधव) यांच्या सारखे निकटचे सहकारी गमावल्याने त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी पवार हे मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास खास पंढरपूर दौऱ्यावर येणार आहेत.

मंगळवारी दुपारी बारा वाजता पुण्यावरून पवार हे मोटारीने पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे येणार आहेत. कै. राजु बापू पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन नंतर ते दुपारी एक ते दीड या वेळात पंढरपूर येथे कै. सुधाकरपंत परिचारक यांच्या वाड्यात त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. त्यानंतर  ते कैकाडी महाराज मठामध्ये कै. रामदास महाराज जाधव यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करणार आहेत.  दुपारी दोन वाजता पवार यांचे जिल्हा न्यायालया लगत आमदार भारत भालके यांच्या निवासस्थानी आगमन होईल. दुपारी पावणेतीन नंतर पवार हे मोटारीने बारामती कडे रवाना होणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या