…आणि शेवटी निष्ठा जिंकली, रोहित पवार यांचा शिंदे गटावर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत झालेल्या शिवसेनेच्या आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याकडे राज्यभरातील जनतेचे लक्ष लागले होते. आता यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एमएमआरडीच्या मैदानावर भाषण सुरू असताना, सभेसाठी जमलेला जमाव हळूहळू सभास्थळावरुन काढता पाय घेत असल्याचे दिसून आले. याचा व्हिडिओही समोर आला आहे.

विशेष म्हणजे शिंदे गटाकडून आपल्या पहिल्या दसरा मेळाव्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली गेली होती. राज्यभरातून लोकांना आणण्यासाठी चोख व्यवस्थाही करण्यात आली होती. यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च झाल्याचेही समोर आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी ट्वीटद्वारे शिंदे गटाला टोला लगावला आहे.

आमदार रोहित पवार म्हणाले दसरा मेळाव्याच्या दोन्ही सभा बघितल्या, लोकांमध्ये उत्साह-निष्ठा बळजबरीने किंवा अन्य मार्गांनी आणता येत नाही, माणसं स्वयंस्फूर्तीने आली तरच उत्साह शेवटपर्यंत टिकतो आणि निष्ठा दिसते हेच पुन्हा अधोरेखित झाले, असे ते म्हणाले. मुंबईचा बालेकिल्ला ढासळत असल्याची चर्चा मी ऐकली होती. पदाधिकारी गेल्याने एखाद-दुसरा बुरुज ढासळू शकतो ,परंतु सामान्य कार्यकर्ते , जनता सोबत असली तर किल्ला मात्र अभेद्य राहतो, याची प्रचीती कालच्या गर्दीने दिली आणि शेवटी निष्ठा जिंकली, असे म्हणत त्यांनी नावाचा उल्लेख न करता शिंदे गटावर निशाणाही साधला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणामध्ये प्रामुख्याने ठाकरे कुटुंबाबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केल्याचे पहायला मिळाले. मुख्यमंत्री शिंदे यांचं भाषण जवळजवळ दीड तास सुरु होते. रात्री साडेआठच्या आसपास मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषणाला सुरुवात केली आणि ते दहा वाजेपर्यंत बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या या लांबलेल्या भाषणादरम्यान बीकेसीच्या मैदानामध्ये सभेसाठी जमलेला जमाव हळूहळू सभास्थळावरुन काढता पाय घेत असल्याचे दिसून आले.