
अजित पवारांच्या घरी ‘देवगिरी’वर झालेल्या बैठकीला मला बोलावले नव्हते. मी गेटक्रश केले होते आणि तिथे गेले होते. माझ्या भावाचं घर आहे. मी जाऊ शकते. मी चर्चेत नव्हते. मी विचारलं, पण मला कुणीच काही सांगितलं नाही. त्यांच्यात बेसिक चर्चा झाली होती. तुम्ही प्रस्ताव द्या, मी बाबांशी बोलते, असे मी सांगितले होते, मात्र माझ्यासोबत भाजपसोबत जाण्याबाबत कुठलीही चर्चा झाली नव्हती, असे स्पष्ट करत राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांनी केलेला दावा फेटाळून लावला.
अजित पवार यांनी, मुलांपेक्षा मुली वंशाचा दिवा असतात, असं काही जणांनाच वाटत असल्याच म्हटलं आहे. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, तो प्रत्येकाचाच वैयक्तिक अधिकार आहे. कुणाला काय वाटतं. सावित्रीबाई फुले यांनी मला शिक्षणाचा अधिकार दिला. मोदींनी संसदेत महिला आरक्षणाचे बिल आणले. शरद पवार आणि राजीव गांधी यांनी 50 टक्के आरक्षण दिले होते. अजित पवार जे बोलत आहेत त्यांना तो अधिकार आहे. बऱयाच गोष्टी आहेत ज्या बाहेर बोलायच्या नसतात. माझ्या आईचे माझ्यावर संस्कार आहेत. माझी लढाई वैचारिक आहे आणि ती भाजपशी असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
ऑफर होती, पण मी गेलो नाही – अनिल देशमुख
मला प्रफुल्ल पटेल आणि अजित पवारांनी मंत्रीपदाची ऑफर दिली होती. शपथविधीवेळी मी पुण्यात होतो. मला प्रफुल्ल पटेलांचे पह्न आले होते, पण मी शरद पवारांना सोडून येणार नसल्याचे स्पष्ट शब्दांत सांगितले होते, असे राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख म्हणाले. मी चारवेळा त्यांच्या बैठकीला गेलो होतो. शरद पवार 83 वर्षांचे आहेत. 83 वर्षांच्या बापाला एकटे सोडू नका, अशी भूमिका मांडल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.
मी नाही, त्यांनीच सोळंकेंना शब्द दिला -जयंत पाटील
प्रकाश सोळंके यांना मंत्री व्हायचे होत. मी बीड जिह्यातून सीनिअर आहे, मला मंत्री करा ही त्यांची अपेक्षा होती. त्यावर माझ्यासोबत त्यांची चर्चा सुरू होती. त्यावेळी अजितदादांनी मला न विचारता सोळंके यांना कार्याध्यक्ष बनवण्याचा शब्द दिला होता, असे स्पष्ट करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांनी केलेला आरोप फेटाळून लावला. मी कोणत्याही व्यावसायिकाच्या घरी बैठकीत उपस्थित नव्हतो. माझ्या घरी कुठलीच मीटिंग झाली नाही, असेही ते म्हणाले.
बापाची चप्पल घातल्याने अक्कल वाढत नाही – आव्हाड
बापाची चप्पल पायात आली म्हणून माणूस बाप होत नाही. फक्त पाय वाढलेला असतो, अक्कल वाढत नसते. तुम्ही हे जर सांगत असाल की, शरद पवारांच्या खूप गोष्टी आम्हाला माहिती आहेत त्या आम्ही हळूहळू काढणार, तर खुशाल काढा. शरद पवारांनी असली अनेक आव्हानं बघितली आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांना ठणकावले.


























































