पूरबाधित गावांवर राहणार आता एनडीआरएफ चा वॉच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कुडाळ

एखाद्या आपत्कालीन प्रसंगी अपुऱ्या साधनसामग्रीमुळे शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा बोजवारा उडाल्याचे चित्र बऱ्याचवेळा पाहायला मिळते. आता सिंधुदुर्गातील पुरबाधित गावांवर नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (पुणे) या शासकीय आपत्ती यंत्रणेचा वॉच राहणार आहे. त्यादृष्टीने संबधित गावांचा सर्व्हे करून माहिती अपडेट करण्याचे काम सुरु आहे. काही आपत्ती उद्भवल्यास या यंत्रणेच्या पथकातील जीवरक्षक मदतकार्यासाठी थेट त्या गावात पोहचणार आहेत.

पावसाळ्यात आपत्कालीन गावात काहीवेळा गंभीर परिस्थिती निर्माण होत असते. जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यत्रंणा काहीवेळा कुचकामी ठरते. पुरेशी साधनसामग्री तसेच समक्ष मनुष्यबळ नसल्याने मदतकार्य यंत्रणा तोंडघशी पडते. पूरजन्य स्थितीत एखाद्या कुटुंबाचा जीव धोक्यात असेल, तर जिल्ह्यातील सामाजिक संस्थाच मदतीला धावून येतात.
पुणे येथील एनडीआरएफ ही शासनाशी निगडीत असलेली आपत्कालीन यंत्रणा या जिल्ह्यात काम करणार आहे. जिल्ह्यातील पुरबाधित गावांची माहिती जमा करण्यासाठी या यंत्रणेने सुरुवात केली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनामार्फत प्रत्येक तहसील कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून पूरबाधित गावांची माहिती घेऊन त्या गावांची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे.

पूरबाधित गावची भौगोलिक परिस्थिती, आपत्तीमागील कारणे, गावची लोकसंख्या तसेच तेथील महत्त्वाच्या लोकांचे संपर्क क्रमांक अशी माहिती संकलित केली जाणार आहे. आपत्कालीन घटना घडल्यास एनडीआरएफ यंत्रणेचे जीवरक्षक त्या गावात मदतकार्यासाठी थेट पोहोचणार आहेत. कुडाळ तालुक्यातून पूरबाधित गावांचा सर्व्हे करण्यास सुरुवात केली आहे पुणे येथील या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या पथकाने या तालुक्यातील पूरबाधित सरंबळ, चेंदवण, पावशी व कुडाळ आंबेडकर नगर आदि गावांचा सर्व्हे केला. या पथकामध्ये हवालदार शंकर मराठे, संदीप खडसरे, दत्तात्रय पाटील व तानाजी चव्हाण यांचा समावेश होता. मंडळ अधिकारी उपस्थित होते.