‘नीट’ पेपरफुटी प्रकरण- तिसरी ‘मनीषा’ पुण्यात जेरबंद, भौतिकशास्त्राचे प्रश्न लीक; प्राचार्या मनीषा हवालदार अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरात गाजत असलेल्या ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पुण्यातील आणखी एका शिक्षिकेला ताब्यात घेतले आहे. शेठ हिरालाल सराफ प्रशालेत प्राचार्य म्हणून कार्यरत असलेल्या भौतिकशास्त्राच्या (फिजिक्स) शिक्षिका मनीषा संजय हवालदार यांना सीबीआयने अटक केली. हवालदार या परीक्षा प्रक्रियेशी संबंधित असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

मनीषा हवालदार या पुण्यातील विद्या प्रसारणी सभेच्या शेठ हिरालाल सराफ प्रशाला येथील प्राचार्या आहेत. नीट-यूजी 2026 परीक्षा प्रक्रियेत राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) यांनी त्यांची तज्ञ म्हणून नियुक्ती केली होती. त्यांच्याकडे भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेची संपूर्ण माहिती उपलब्ध होती. एप्रिल 2026 दरम्यान त्यांनी भौतिकशास्त्र विषयातील काही प्रश्न सहआरोपी प्रा. मनीषा मांढरे यांच्यासोबत शेअर केले. त्यांनी दिलेले प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्नपत्रिकेशी जुळल्याचे सीबीआयच्या तपासात समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले.

यापूर्वी या प्रकरणात पुण्यातील ब्युटीपार्लर चालविणारी महिला मनीषा वाघमारे हिला अटक केली. त्यानंतर मुख्य सूत्रधार म्हणून रसायनशास्त्राचा प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी याला सीबीआयने पुण्यातून ताब्यात घेतले. कुलकर्णी हादेखील परीक्षा प्रक्रियेशी संबंधित होता. त्याच्या चौकशीतूनच मनीषा मांढरे यांचा सहभाग उघड झाल्याने मॉडर्न महाविद्यालयातील जीवशास्त्राच्या शिक्षिका मनीषा गुरुनाथ मांढरे हिला सीबीआयने अटक केली होती. मांढरे यांचा वनस्पतीशास्त्र आणि प्राणिशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकांशी संबंध होता. तपासादरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न आणि अचूक उत्तरांची माहिती दिल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता या प्रकरणात भौतिकशास्त्र विषयाच्या मनीषा हवालदार हिला अटक करण्यात आली. तिच्या चौकशीतून काही नावे समोर येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तिन्ही महिला आरोपींची नावे ‘मनीषा’ असल्याने हा चर्चेचा विषय झाला आहे.

…आतापर्यंत 11 जण अटकेत

तपासादरम्यान सीबीआयने पुणे, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, लातूर, दिल्ली आणि अहिल्यानगरसह देशातील विविध भागांत छापेमारी केली. या कारवाईत आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर येथून एकूण 11 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून
लॅपटॉप, मोबाईल फोन, बँक व्यवहारांची कागदपत्रे तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली असून त्यांचे विश्लेषण सुरू आहे.

प्रा. कुलकर्णी डॉ. शिरुरेच्या मुलाला घरी जाऊन शिकवायचा

 ‘नीट’ पेपरफुटीने संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. हजारो रुपये मानधन घेऊन ‘एनटीए’च्या पेपर सेटिंग करणाऱ्या समितीवर काम करणारा प्रा. पी. व्ही. कुलकर्णी हा नामवंत बालरोगतज्ञ डॉ. मनोज शिरुरेच्या मुलाला शिकवण्यासाठी त्याच्या घरी जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या ‘होम’ क्लासची फी होती तीन लाख रुपये!