भाच्याने मामाला गंडवले, एक कोटी 87 लाखाचा ऐवज लंपास केला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मामाने सराफांना विकण्यासाठी दिलेले एक कोटी 77 लाख 85 हजार किमतीचे चांदीचे दागिने व 10 लाखांची रोकड असा एक कोटी 87 लाखांचा ऐवज लंपास करून कानपूरमध्ये स्वतःचे दुकान थाटणाऱ्या भाच्याला व्ही.पी. रोड पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून अर्ध्याहून अधिक अपहार केलेला ऐवज हस्तगत केला आहे.

सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा व्यवसाय करणाऱ्या सुरेंद्र आचार्य (55) याने 254 किलो चांदीचे दागिने कानपूर येथील सराफांना विकण्यासाठी दिले होते. तसेच त्या व्यवहाराकरिताचे मेकिंग चार्जेस 10 लाख रुपये भाचा यशवंत आचार्यला (38) दिले होते. यशवंत तो ऐवज घेऊन कानपूरला गेला, तेथे त्याने काही दागिने विकले आणि ते पैसे सुरेंद्रला न देता स्वतःसाठी ठेवले. त्या पैशातून यशवंतने कानपूरमध्ये आपले दुकान थाटून व्यवसाय सुरू केला. भाचाने आपल्याला चुना लावल्याचे स्पष्ट होताच सुरेंद्रने व्ही.पी. रोड पोलिसात तक्रार दिली. वरिष्ठ निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अभिजित शिंदे, उपनिरीक्षक दिलीप तांबे व पथकाने कानपूर गाठून यशवंतला पकडले. तसेच त्याने विकलेले 111 किलो वजनाचे चांदीचे दागिने हस्तगत केले.