गोवंडीत होणार 580 खाटांचे अद्ययावत रुग्णालय! उपनगरातील हजारो रुग्णांना होणार फायदा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी,

गोवंडी येथे पालिका लवकरच 580 खाटांचे नवीन अद्ययावत रुग्णालय सुरू करणार आहे. शताब्दी रुग्णालयाच्या आवारातच ही नवी इमारत बांधण्यात येणार आहे. या दहा मजली इमारतीच्या बांधकामासाठी पालिका 501 कोटी खर्च करणार असून तीन वर्षांत हे काम पूर्ण करणार आहे. या रुग्णालयामुळे उपनगरातील हजारो गोरगरीब रुग्णांना मोठा फायदा होणार आहे.

पालिकेच्या रुग्णालयांमध्ये मुंबईतीलच नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येत असतात. या पार्श्वभूमीवर पालिकेने आपल्या रुग्णालयांमध्ये अद्ययावत सेवा आणि नवीन रुग्णालयांचे बांधकाम करण्याचे धोरण आखले आहे. यामध्ये आता ‘एम/पूर्व’ विभागातील गोवंडी बोरला गावातील सी.टी.एस. क्र. 372, 371/1 व देवनार गावातील सी.टी.एस.क्र. 301/1अ, 306 मधील शताब्दी रुग्णालय इमारतीच्या आवारातच ही नवी इमारत बांधण्यात येणार आहे. मे. ग्लोबल झोन सॅनिटरी इफ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीला हे रुग्णालय बांधण्याचे काम देण्यात आले आहे. याबाबतचा प्रस्ताव आज स्थायी समितीत मंजूर करण्यात आला. अद्ययावत सुविधा असलेल्या या रुग्णालयामुळे गोरगरीब रुग्णांना मोठा फायदा होणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.

असे होणार काम
रुग्णालयाच्या कामासाठी एकूण 5019175435 इतका खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये संपूर्ण नवीन इमारतीचे आरसीसी स्वरूपाचे बांधकाम, इमारतीसंबंधित इतर सर्व कामे, सभोवतालच्या परिसराचे सुशोभीकरण, विद्युत व यांत्रिकी कामे, आगप्रतिबंधक यंत्रणा, वातानुकूलित यंत्रणा, मॉडय़ुलर ओटी व मेडिकल गॅस यंत्रणा, न्यूमॅटिक ट्रान्सपोर्ट यंत्रणा अशा सुविधा केल्या जाणार आहेत. यासाठी अर्थसंकल्प 2019-20 मध्ये 125 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.