संगमेश्वरात लाकूड व्यापाऱ्यांची लवकरच नवी संघटना!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । देवरूख

संगमेश्वर तालुका शेतकरी लाकूड व्यापारी संघटनेत फुट पडली असून आता नवीन संघटना स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या नवीन संघटनेची घोषणा दिवाळी नंतर करण्यात येणार आहे.

संगमेश्वर तालुक्यात लाकूड व्यापारीवर्गाच्या अडचणी सोडविण्यासाठी युती शासनाच्या काळात प्रमोद कदम, बबन झगडे, संदिप सुर्वे, गंगाराम पटेल, कांती पटेल, शैलू पाटोळे, चंद्रकांत सावंत या लाकूड व्यापाऱ्यांनी पुढाकार घेत तालुका शेतकरी लाकूड व्यापारी संघटनेची मुहूर्तमेढ रोवली गेली.
या संघटनेच्या माध्यमातून लाकूड गिरण चालक व छोटे मोठे लाकूड व्यवसायिक यांना वन विभागात येणाऱ्या रितसर परवानगीबाबत मार्गदर्शन व येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी व यातून योग्य मार्ग काढत व्यापारीवर्गाचे काम सुलभ होणे हाच उद्देश होता. गेली अनेक वर्षे संघटनेची धुरा तात्कालिन शिवसेनेचे पदाधिकारी प्रमोद कदम यांच्याकडे होती. या काळात अनेक जुने जाणते व्यापारी काळाच्या पडद्या आड गेले. तर अनेक नवे व्यावसायिक या व्यवसायात आले.
वन विभागात येणाऱ्या अडचणी सोडवितांना जाचक नियमांची कडक अंमलबजावनीने व्यापारी त्रस्त होवू नयेत म्हणून संघटनेने कायम सर्व संमतीने मार्ग काढत व्यापारीवर्गाला दिलासा दिला. हे होत असतनाच या संघटनेत राजकिय हस्तक्षेप वाढू लागला. गेली अनेक वर्षे काम करणारे कदम यांनी स्वत: पुढाकार घेत संघटनेची सर्व सुत्रे तरूण व्यापाऱ्यांच्या हातात दिली.

१६ जून १८ ला संघटनेत बदल होत नवीन कार्यकारणी नियुक्त झाली. संघटनेचा मागील सर्व हिशोब पूर्ण करत प्रमोद कदम यांनी सूत्रे खाली ठेवली. त्यानंतर नवीन कार्यकारणीने काम सुरू केले. पण व्यापारी हिताकडे लक्ष न देता कुरघोडीच्या नादात लाकूड व्यापारी वर्गाच्या समस्यांकडे दर्लक्ष झाले. व्यापारी वर्गाच्या समस्या वाढल्या व एकमेकांच्या विरोधात षडयंत्र सुरू झाल्याने अधिकारी वर्गालाही नामोहरम करणे सुरू झाले. वन विभागाच्या विरोधात तक्रारी व पेपरबाजी सुरू झाल्याने लाकूड व्यापारी वर्गाची नियमित कामेही रखडू लागली. त्यावर संघटनेने वेळीच पाहीजे तेवढे लक्ष न दिल्याने लाकूड व्यापारी हवालदिल झाला. गेले दोन महिने वाहतुक पास नियमात असूनही मिळणे कठीण झाल्याने काही व्यापाऱ्यांनी या नवीन संघटनेतून बाहेर पडत पहिल्यासारखी नवीन राजकारण विरहीत संघटना सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पुन्हा माजी अध्यक्षांना मनधरणी करीत सुत्रे हाती घेण्याचा प्रस्ताव दिल्याची चर्चा सुरू आहे.