
सामना प्रतिनिधी । मुंबई
इंद्राणी आणि पीटर मुखर्जी यांची २००२ ते २००७ या काळात परदेशी नागरिक नोंदणी कार्यालयात कार्यरत असताना पहिल्यांदा ओळख झाली. त्यानंतर ते आपल्याला २०१२ साली भेटले आणि त्यांनी एका नातेवाईकाला शोधण्याची विनंती केली. ज्या व्यक्तीचा शोध घ्यायला त्यांनी सांगितले होते ती व्यक्ती दुसरी-तिसरी कुणी नसून शीना बोरा असल्याचे आपल्याला तब्बल तीन वर्षांनंतर म्हणजेच २०१५ साली कळले अशी माहिती मुंबईचे सहपोलीस आयुक्त देवेन भारती यांनी आज आपल्या साक्षीदरम्यान विशेष सीबीआय न्यायालयात दिली.
शीना बोरा हत्याकांड प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयात साक्षीपुरावे नोंदवून घेण्याचे काम सुरू आहे. व्हिसाची मुदत वाढवून घेण्यासाठी इंद्राणी आणि पीटर मुखर्जी हे परदेशी नोंदणी कार्यालयात आले होते. त्या वेळी आपली त्यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर २०१२मध्ये हे दांपत्य मला भेटले आणि त्यांनी त्यांच्या एका नातेवाईकाचा शोध घेण्यास सांगितले. तसेच त्याचा मोबाईल क्रमांकही आपल्याला दिला. मात्र काही दिवसांनी त्या नातेवाईकाचा शोध लागला असून त्याबाबतचा तपास थांबवावा अशी विनंती त्यांनी केली, असेही भारती म्हणाले. २०१५ साली जेव्हा शीना बोरा हत्याकांड प्रकरण उघडकीस आले त्यानंतर मी खार पोलीस ठाण्यात जाऊन दोन वेळा जबाब नोंदवले होते. त्या वेळी २०१२मध्ये मुखर्जी दांपत्याने मला दिलेला मोबाईल क्रमांक आणि या हत्येच्या अनुषंगाने खार पोलीस ठाण्यात २०१५मध्ये समोर आलेला मोबाईल क्रमांक एकच असल्याचे माझ्या लक्षात आले, असेही भारती यांनी सांगितले. ही माहिती आपण पोलीस निरीक्षक अलखनुरे यांना दिली होती, असेही भारती यांनी साक्षीदरम्यान सांगितले. भारती यांची साक्ष अजूनही सुरू असून बचाव पक्षाचे वकील उद्या उलटतपासणी घेणार आहेत.

























































