निळवंडे कालव्‍याच्या कामाला आडवे याल तर खबरदार, शिवसेनेचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कोपरगाव

गेली अनेक वर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांनी व त्यांच्या विचार धारेने निळवंडेचे राजकारण करून 50 वर्षे घालविली. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी लक्ष घातले. खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रयत्नामुळे व शिर्डी साईबाबा संस्थानच्या सहकार्याने निधी उपलब्ध आहे, निविदा पूर्ण आहे. भू संपादनाची प्रक्रिया पूर्ण आहे, असे सर्व झाले असताना खोडा घालण्यासाठी जर भुयारी कालव्‍याची शक्‍कल लढवून कोणी निळवंडे कालव्‍याच्या कामाला आडवे येऊन लाखो शेतक-यांना उद्ध्वस्त करणार असेल शिवसेना कदापी खपवून नाही, असा इशारा शिवसेनेचे नगर उत्‍तर उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्‍या विरोधातील निषेध मोर्चात दिले.

प्रमोद लबडे म्हणाले, गोदावरी कालव्यांना 105 वर्षे तर निळवंडेला 49 वर्षे पूर्ण होऊनही त्यांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व्यवस्था सुरळीत होऊ शकली नाही. सन 1999 ते 2014 सलग 15 वर्षे राष्ट्रवादीकडे जलसंपदा व वीज हे शेतक-यांच्या जिव्हाळयाचे खाते होते. निधी उपलब्ध आहे, निविदा पूर्ण आहे, भू संपादनाची प्रक्रिया पूर्ण आहे. जिल्हाधिकारी यांनी पोलीस संरक्षण उपलब्ध करून दिले आहे. कालव्याच्या कामाला सुरूवात होत असल्याचे लक्षात येताच नेहमीच कुटनिती करणारे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या विचाराचे कार्यकर्ते व आमदार पुत्र यांनी निवडणूक डोळयासमोर ठेऊन होत असलेल्या कालव्यांना विरोध करण्याचा पवित्रा घेत राजकारण करीत आहेत. परंतु निळवंडे कालव्‍याच्या कामाला आडवे याल तर खबरदार असा इशारा लबडे यांनी दिला.