
सामना प्रतिनिधी, निफाड
तालुक्यातील येवला लासलगाव मतदारसंघातील गावांत यंदा जोरदार पाऊस न पडल्याने परिसरात दुष्काळजन्य परिस्थीती निर्माण झाली आहे. पावसाअभावी खरिपातील बाजरी मका, सोयाबीन हे पिके हंगामासह हातातून गेली आहेत. त्यातच आता उन्हाळ कांदा, गहू, हरभरा पीक ही पाण्याअभावी वाया जाईल अशी स्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे पाण्याचा तुटवडा तर दुसरीकडे शेतमालास योग्य बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
शेत पिकांसाठी पाणी मिळावे यासाठी शेतकऱयांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ही दिवसेंदिवस गंभीर होत असून जनावरांच्या चाऱयाचा प्रश्न भेडसावू लागला आहे. पावसाअभावी खरिपातील बाजरी मका,सोयाबीन हे पिके हंगामासह हातातून गेलेच आहे. मात्र आता उन्हाळ कांदा, गहू, हरभरा ही पीकेही धोक्यात आली आहेत. यावर्षी अस्मानी संकटामुळे हिवाळ्यातच पाणी कमी पडल्याने भाजीपाला, टोमॅटो आदी पिके पूर्णपणे वाया जाण्याची शक्यता आहे. एकीकडे पाण्याचा तुटवडा तर दुसरीकडे सरकारचे धोरण हे शेतकरी,मजुर विरोधी असल्याने व शेतमालास योग्य बाजार भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी, मजुर संकटात सापडला आहे.
निफाड तालुक्यात यावर्षी एकदाही जोरदार पाऊस न झाल्याने हिवाळ्यातच तालुक्यातील बरेच बंधारे नद्या पाझर तलाव विहिरींनी तळ गाठला आहे. तालुक्यातील पाण्याचा प्रश्न येत्या काही दिवसांत गंभीर बनत चालला आहे. याचा फटका शेती व्यवसायालाही बसत असून तालुक्यातील शेतकऱयांच्या खिशाला आर्थिक झळ बसत आहे. येवला लासलगाव मतदार संघात रोजगार हमी योजना अंतर्गत कामे सुरू केले तर गोरगरीब जनतेला रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.
शेतकऱ्यांना दिलासा द्यावा…!
तालुक्यात वर्षभर शेतकऱ्यांच्या कांदा शेतमालास शासनाच्या हमीभावाचा फायदा झाला नाही, सध्या दुष्काळाची छाया गडद होत आहे अशा प्रतिकूल परिस्थितीत शासनाने दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून शेतकऱयांना भरपाई द्यावी, तालुक्यातील शेतकरी दुष्काळाने होरपळत आहे याकरता शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे येवला लासलगाव विधानसभा संघटक, पंचायत समितीचे उपसभापती रूपचंद जी भागवत यांनी केली आहे.




























































