
सामना ऑनलाईन, मुंबई
काही महिने सत्तेत एकत्र नांदल्यानंतर एकमेकांचे राजकीय वैरी झालेल्या नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्यात पुन्हा एकदा एकत्र येण्यासाठी वातावरणनिर्मिती व्हायला सुरूवात झाली आहे. नितीश कुमार यांनी मंगळवारी लालू प्रसाद यादव यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी फोन केला होता. लालू प्रसाद यादव यांच्यावर मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टीट्यूटमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी नितीश यांना हा फोन केल्याचं सांगण्यात येत आहे. फोनवरील या संभाषणात इतर कोणत्या गोष्टींवर चर्चा झाली हे मात्र सांगायला दोन्ही पक्षातील नेते तयार नाहीयेत.
गेल्या वर्षी जुलै २०१७ मध्ये नितीश यांनी लालू यांच्याशी असलेली आघाडी मोडण्याचा निर्णय घेतला होता. नितीश यांनी भाजपसोबत घरोबा केला आणि बिहारची सत्ता हाकायला सुरूवात केली, मात्र भाजप मित्र पक्षांना फारसं महत्व देत नसल्याची कुरबुर काही दिवसांतच नितीश यांच्या पक्षातीन नेत्यांनी करायला सुरूवात केली. सध्या नितीश कुमार यांच्या जनता दल (संयुक्त) आणि भाजपतील तणाव शिगेला पोहोचल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या या दोन पक्षांमध्ये तणाव २०१९ला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठीच्या जागावाटपावरून सुरू झाला आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागा असून यातील २५ जागा आपल्याला मिळायला हव्या असं नितीश कुमार यांच्या जनता दल (संयुक्त)ने म्हटलं आहे. जर या जागा मिळणार नसतील तर आम्ही स्वबळावर लढायला तयार असल्याचंही जनता दल (संयुक्त)च्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.
२०१४ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत जनता दल (संयुक्त)ला फक्त २ जागांवर विजय मिळाला होता, तर भाजपला १६ जागांवर विजय मिळाला होता. त्यामुळे भाजपने नितीश कुमार यांच्या पक्षाने केलेली २५ जागांची मागणी फेटाळल्याचं सांगण्यात येत आहे. जागांसाठीच्या या भांडणामुळेच दोन्ही पक्षात वाद निर्माण झाला आहे.

























































