
सामना ऑनलाईन । नागपूर
नागपूरमध्ये पावसाळी अधिवेशन सुरू असून गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे विधानभवनातील वीज पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. कामकाज सुरू होण्यापूर्वीच वीज गेल्याने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची धावपळ उडाली आहे. वीज गेल्याने विविध मागण्यांसाठी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करणाऱ्या विरोधकांना मोबाईलचे फ्लॅश लाईट पेटवून आंदोलन करावे लागले. विधीमंडळाला वीजपुरवठा सुरळीत सुरू रहावा यासाठी उभारण्यात आलेल्या लाईटरूममध्ये पाणी शिरल्याने वीजपुरवठा बंद करण्यात आल्याचं उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. वीजपुरवठा खंडीत झाला नसून तो तात्पुरता बंद करण्यात आल्याचं त्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी भाजप सरकारचा हट्टीपणा हा गोंधळाला जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. वर्षानुवर्ष पावसाळी अधिवेशन मुंबईत होत होतं, ते नागपुरात हलवण्याचा भाजपने हट्टीपणा केल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे. उर्जामंत्री जे दावा करीत आहे की वीज आहे मात्र तो तात्पुरता बंद करण्यात आलाय तो दावाही खोटा असल्याचं अजित पवारांचं म्हणणं आहे. सध्या असलेली वीज ही बॅटरीवरची असून एक तासानंतर ती देखील जाईल असं अजित पवार यांचं म्हणणं आहे.
मंत्री, विरोधीपक्षनेते यांच्या दालनातील वीजही गेल्याने भयंकर उकाड्याचा त्रास या मान्यवरांना भेटायला येणाऱ्यांना आणि तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी अंधारातच बैठका घेत दिवसभराची रणनिती आखणे सुरू ठेवले होते.


























































