रेडीरेकनरच्या दरात कोणतीही वाढ नाही; राज्य सरकारचा मोठा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोविडच्या पार्श्वभूमीवर रेडीरेकनरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात येणार नाही, अशी घोषणा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज केली. यामुळे गुढीपाडव्याला स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करू इच्छिणाऱयांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्य सरकारने गेल्या वर्षी सप्टेंबर 2020 मध्ये रेडीरेकनरचा दर जाहीर केला होता. त्यात वाढ झाल्यामुळे बांधकाम व्यवसायावर परिणाम झाला होता. मात्र त्याचवेळेस राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात दिलेल्या सवलतीमुळे सर्वसामान्यांना व बांधकाम क्षेत्रालाही दिलासा मिळाला होता. आता कोरोनाचे पुन्हा संकट निर्माण झाले असले तरी बांधकाम व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येत आहे. या परिस्थितीत बांधकाम व्यवसायाला राज्य सरकारच्या पाठबळाची आवश्यकता आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन 2021-22 वार्षिक मूल्यांकन दरामध्ये (रेडीरेकनर) वाढ करू नये, अशी विनंती क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेने केली होती.

या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने 2021-22च्या रेडीरेकनरच्या दरात कोणताही बदल करण्यात येणार नाही, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या वर्षासाठी रेडीरेकनरचे दर कायम राहातील.

मुद्रांक शुल्कची सवलत बंद

राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुद्रांक शुल्काच्या दरात (स्टॅम्प डय़ुटी) सवलत जाहीर केली होती. 31 मार्च 2021 पर्यंत सवलत दिली होती. पण ही सवलत संपुष्टात आली असून 1 एप्रिल 2021 पासून पूर्वीप्रमाणे मुद्रांक शुल्काचे दर लागू होतील.

महिलेच्या नावाने घर खरेदी केल्यास सवलत  

महिला किंवा महिलांच्या नावाने होणाऱया घरांच्या खरेदी-विक्रीवर मुद्रांक शुल्कामध्ये प्रचलित दरातून एक  टक्का सवलत देण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात केली होती.  महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली होती.