
सामना ऑनलाईन । मुंबई
शताब्दी एक्स्प्रेसमध्ये ‘मैं भी चौकीदार’ असे लिहिलेल्या कपामधून प्रवाशांना चहा देण्यात येत होता. तर रेल्वेच्या तिकिटांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र छापण्यात आले होते. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचे उल्लंघन होत होते. हे लक्षात घेऊन रेल्वेने आता कंबर कसली आहे. रेल्वेच्या हद्दीतील राजकीय जाहिरातींचे बॅनर्स ताबडतोब उतरवण्यात यावेत असे आदेशच रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना दिले आहेत.
दोन दिवसांपूर्वी शताब्दी एक्स्प्रेसमध्ये चहाच्या कपांवर ‘मैं भी चौकीदार’ असे लिहिलेले आढळले. या माध्यमातून भाजपचा प्रचार सुरू होता. ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर संबंधित ठेकेदाराला एक लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि विभागीय महाव्यवस्थापक यांना रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी रेल्वेच्या हद्दीतील राजकीय जाहिरातींचे बॅनर्स तसेच रेल्वेच्या विविध वस्तूंवरून कुठल्याही राजकीय पक्षाच्या जाहिराती करू नयेत असे आदेश दिले आहेत.
या ठिकाणी राजकीय जाहिराती नकोत
रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी रेल्वेची स्टेशनरी, रेल्वे तिकीट, रेल्वेचे डबे, स्थानके तसेच रेल्वेच्या हद्दीत राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे किंवा नेत्यांचे फोटो असलेल्या जाहिराती तातडीने काढून टाकाव्यात. किंबहुना संबंधित जाहिरात संस्थेला तसे आदेश द्यावेत असे रेल्वेच्या विभागीय महाव्यवस्थापकांना सांगितले आहे.
राजकीय पक्षांनी सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर राजकीय जाहिरातींसाठी करू नये अशी विनंती रेल्वे बोर्डाने विविध राजकीय पक्षांना केली आहे.
सुपरवायझर आणि पॅण्ट्री प्रमुखाच्या हलगर्जीपणामुळे शताब्दीमधील राजकीय जाहिरातबाजीकडे दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनास आले.
























































