
सामना प्रतिनिधी, मुंबई
अण्णाभाऊ साठे महामंडळ आर्थिक घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांना दिलास देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज नकार दिला. रमेश कदम यांची तुरुंगात बेशिस्त वागणूक सुरूच असून जामीन मिळाल्यास या घोटाळ्यातील तपासावर व साक्षीदारांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते, असा राज्य सरकारकडून आज युक्तिवाद करण्यात आला. हायकोर्टाने राज्य सरकारचा हा युक्तिवाद ग्राह्य धरत कदम यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
अण्णाभाऊ साठे मंडळाच्या अध्यक्षपदी असताना राष्ट्रवादीच्या माजी आमदार रमेश कदम यांनी बोगस लाभार्थी दाखवत शेकडो कोटींचा घोटाळा केला. या प्रकरणी रमेश कदम यांच्यासह 12 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. रमेश कदम यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून जामीन मंजूर झाला असून सीआयडीने गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी आपल्याला जामीन मिळावा म्हणून रमेश कदम यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यासमोर आज या प्रकरणी सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी न्यायमूर्तींनी त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
























































