उत्तर कोरियाची ऑलिम्पिकमधून माघार, कोरोना महामारीमुळे घेतला निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर कोरियाने टोकियो ऑलिम्पिकमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंचे आरोग्य आणि सुरक्षेला प्राधान्य देत आपण असा निर्णय घेत असल्याचे उत्तर कोरियाच्या क्रीडा मंत्रालयाने जाहीर केले. मात्र उत्तर कोरियाच्या या निर्णयामुळे टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजनाला मोठा धक्का बसला आहे.

25 मार्च रोजी उत्तर कोरियाच्या राष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या बैठकीत टोकियो ऑलिम्पिकमधून माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती तेथील क्रीडा मंत्रालयाच्या संकेतस्थळाने दिली. उत्तर कोरियाच्या या निर्णयामुळे ऑलिम्पिकमध्ये एकत्र येऊन दोन देशांमध्ये शांतता निर्माण करण्याच्या दक्षिण कोरियाच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसलाय. दक्षिण कोरियाच्या एकीकरण मंत्रालयाने मंगळवारी उत्तर कोरियाने तडकाफडकी घेतलेल्या या निर्णयाबद्दल खेद व्यक्त केला.

मात्र उत्तर कोरियाने टोकियो ऑलिम्पिकमधून माघार घेतल्याचे अधिपृत पत्र अद्यापि आम्हाला दिलेले नाही, असे जपानचे ऑलिम्पिक मंत्री तामायो मारुकावा यांनी सांगितले. 2018 मध्ये दक्षिण कोरियात झालेल्या हिवाळी ऑलिम्पिकमध्ये दक्षिण व उत्तर कोरियाचा संयुक्त संघ एकाच ध्वजाखाली सहभागी झाला होता.

आईस हॉकीमध्ये तर उभय देशांचा एकत्रित संघ खेळला होता. या ऑलिम्पिकमध्ये उत्तर कोरियाने 22 खेळाडूंचे पथक पाठविले होते. याचबरोबर सरकारी अधिकारी, कलाकार, पत्रकार व महिलांचा चीयरिंग ग्रुप असे 230 सदस्य पाठविले होते. यावेळीही दक्षिण व उत्तर कोरियाचा मिळून एकच संघ तयार करून उभय देशांत शांतता प्रस्थापित करण्याचा दक्षिण कोरियाचा विचार होता, मात्र उत्तर कोरियाने ऑलिम्पिकमधून माघार घेतल्याने दक्षिण कोरियाच्या सगळ्या प्रयत्नांना सुरुंग लागला आहे.

मीराबाई चानू हिच्या पदकाच्या आशा वाढल्या

उत्तर कोरियाने टोकियो ऑलिम्पिकमधून माघार घेतल्याने हिंदुस्थानची आघाडीची महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू हिच्या ऑलिम्पिक पदकाच्या आशा वाढल्या आहेत. कारण टोकियो ऑलिम्पिक पात्रता क्रमवारीत मीराबाई 49 किलो गटात 3869.8038 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. तिची जवळची प्रतिस्पर्धी उत्तर कोरियाची री सोंग गुम 4209.4909 गुणांसह तिसऱया स्थानावर आहे.

2019च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत री सोंगने चानूला मागे टाकत कांस्यपदकाची कमाई केली होती. त्यावेळी मीराबाईने 201 किलो, तर री सोंगने 204 किलो वजन उचलले होते. त्यामुळे आता उत्तर कोरियाने टोकियो ऑलिम्पिकमधून माघार घेतल्याने मीराबाई चानूच्या पदकाच्या आशा वाढल्या आहेत. सध्याच्या ऑलिम्पिक पात्रता क्रमवारीत चीनच्या तीन वेटलिफ्टर टॉप-5मध्ये आहेत.