
आपला वाढदिवस साजरा करताना कोरोना प्रतिबंधाचे नियम मोडणाऱ्या नॉर्वेच्या पंतप्रधान एर्ना सोलबर्ग यांना पोलिसांनी 20 हजार नॉर्वेजियन क्राऊन (सुमारे एक लाख 70 हजार रुपये ) दंड ठोठावला आहे. एखाद्या देशाच्या पंतप्रधानाला कोरोना प्रतिबंधाचे नियम मोडले म्हणून दंड होण्याची हा जगातील पहिलाच प्रसंग आहे.
नॉर्वेच्या पंतप्रधान एर्ना यांनी आपल्या वाढदिवसाला आपल्या नातेवाईकांना निमंत्रित करीत कोरोना प्रतिबंधातील सोशल डिस्टन्सिंगचा नियम मोडला असे पोलिसांचे म्हणणे आहे. देशाच्या पंतप्रधानपदी दुसऱयांदा विराजमान झालेल्या सोलबर्ग यांनी यंदा फेब्रुवारी एंडिंगला एका रिसॉर्टमध्ये आपल्या 13 नातेवाईकांसह आपला 60वा वाढदिवस साजरा केला होता. मात्र आता सोलबर्ग यांनी आपल्या चुकीबद्दल एका कार्यक्रमात जाहीर माफी मागितली आहे.
देशाच्या कोरोना प्रतिबंधक नियमानुसार नॉर्वेत एखाद्या कार्यक्रमात 10 व्यक्तींच्या वर एकही व्यक्ती सहभागी होऊ शकत नाही, पण पंतप्रधान सोलबर्ग यांच्या बर्थ डे सेलिब्रेशनमध्ये 13 म्हणजे नियमापेक्षा तीन व्यक्ती अधिक होत्या.
पोलीसप्रमुख ओले सेवेरुड यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान सोलबर्ग यांनी मोठय़ा मनाने आपली चूक मान्य करीत माफी मागितली आहे. देशाच्या कायद्यांपेक्षा पंतप्रधानही मोठे नाहीत हे सोलबर्ग यांनी मान्य केले आहे. अशा किरकोळ गुन्ह्यासाठी मोठा दंड लावला जात नाही, पण नियमभंग पंतप्रधानांसारख्या मोठय़ा व्यक्तीकडून झाल्याने दंड लावण्यात आला आहे.

























































