
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (एनएसई) अधिकाऱयांचे फोन टॅप केल्याच्या आरोपाखाली पांडे यांच्याविरुद्ध सीबीआयने आणखी तीन नवे गुन्हे दाखल केले. त्याचप्रमाणे त्यांच्या निवासस्थानाचीही सीबीआयकडून झडती घेण्यात आली.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर सीबीआयने हे गुन्हे दाखल केले आहेत. संजय पांडे यांच्यासह एनएसईच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण आणि रवी नारायण यांच्याविरोधातही सीबीआयने या प्रकरणात नवे गुन्हे दाखल केले आहेत.
पांडे आणि अन्य आरोपींशी संबंधित ठिकाणांवरही सीबीआयने धाडी घातल्या. मुंबई, पुणे, लखनौ, दिल्ली, कोटा आणि चंदिगड येथील 19 ठिकाणी सीबीआयने धाडी घालून झडती घेतली.
पांडे यांच्या मालमत्तांचाही सीबीआयकडून तपास केला जात आहे. सीबीआयकडून 2018 पासून एनएसईच्या लोकेशन स्कॅमची चौकशी केली जात आहे. या घोटाळय़ातील मुख्य आरोपी चित्रा रामकृष्ण यांच्या सांगण्यावरून पांडे यांनी एनएसईच्या अधिकाऱयांचे फोन टॅप केले होते असा आरोप आहे.

























































