मुंबईत पाच हजारांनी सक्रिय रुग्ण घटले, दुपटीचा कालावधी पाच महिन्यांनी वाढला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत गेल्या आठवडाभरापासून दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या घटण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये दररोज दोन हजारांवर गेलेली बाधितांची संख्या एक हजारापेक्षा कमी नोंद होत आहे. दहा हजारांवर चाचण्या होत असतानाही रुग्णसंख्या घटत असल्याने मुंबईसाठी कोरोना उतरतीचा आठवडा ठरत आहे.

मुंबईत कोरोनाच्या तीन लाटा येऊन गेल्यानंतर मे महिन्यात सुरू झालेल्या रुग्णसंख्येने जूनमध्ये थेट दोन हजारांचा आकडा पार केल्याने पालिकेचे टेन्शन वाढले होते, मात्र सद्यस्थितीत रुग्णसंख्या घटण्यास सुरुवात झाल्याने काही प्रमाणात दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. मुंबईत आठवडाभरापूर्वी 26 जून रोजी सक्रिय रुग्णांची संख्या 12 हजार 727 इतकी होती, तर रुग्ण दुपटीचा कालावधी 444 दिवस होता. हे प्रमाण 140 हून जास्त दिवसांनी वाढून 584 दिवसांवर गेले आहे, तर रुग्णवाढीचे प्रमाण 0.113 वरून 0.037 पर्यंत खाली आले आहे. दरम्यान, गेल्या आठवडाभरात मुंबईत 7671 कोरोना रुग्ण आढळले आहेत.

मुंबईचा कोरोना डॅशबोर्ड
आतापर्यंतचे कोरोना रुग्ण – 11,13,470
कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या – 10,84,148
कोरोनामुळे झालेले मृत्यू – 19,612
सध्याची सक्रिय रुग्ण – 9,710
लक्षणे असलेले रुग्ण – 2,410
लक्षणे नसलेले रुग्ण – 7,282
सद्यस्थितीमधील अत्यवस्थ – 18

मुंबईत रुग्ण घटले, 431 नोंद

मुंबईत रुग्णसंख्येची घट सुरूच असून गेल्या 24 तासांत 431 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 2 दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत करण्यात आलेल्या 9052 चाचण्यांमध्ये हे बाधित आढळले आहेत. नव्या रुग्णांमधील 54 जणांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज लागली. यातील 11 जणांना ऑक्सिजनची गरज लागली. तर एकाच दिवसात 1060 जणांनी कोरोनावर मात केली.

कोरोना उतरतीचा आठवडा

आठवडाभराची रुग्णसंख्या
27 जून – 1062
28 जून – 1290
29 जून – 1504
30 जून – 1265
1 जुलै – 978
2 जुलै – 811
3 जुलै – 761