उत्तर प्रदेशात शुक्रवारच्या नमाजनंतर तणाव, पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्यांना चोपून काढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपच्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबराबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद अजूनही उमटत आहेत. शुक्रवारच्या नमाजनंतर त्यांचा निषेध करण्याचं मुसलमान संघटनांनी ठरवलं होतं.  त्यानुसार शुक्रवारी नमाजनंतर काही राज्यात आंदोलनं करण्यात आली. यामुळे तिथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. उत्तर प्रदेशातील प्रयागराज , मुरादाबाद मध्ये नमाजनंतर विरोध प्रदर्शनाला सुरूवात झाली. यामुळे इथलं वातावरण तंग झालं होतं.

कोलकात्यामध्येही हेच चित्र पाहायला मिळालं. दिल्लीतील जामा मशिदीबाहेरही विरोध प्रदर्शन करण्यात आलं. प्रयागराजमध्ये विरोध प्रदर्शन सुरू असताना दगडफेकीला सुरुवात झाली ज्यानंतर तिथली परिस्थिती चघळली आहे.

प्रयागराजमध्ये शुक्रवारच्या नमाजनंतर सुरू झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांवर दगडफेकीसा सुरुवात झाली. जवळपास 1 तास इथे दगडफेक सुरू होती. तिथली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस हरतऱ्हेचे प्रयत्न करत आहेत. प्रयागराजच्या अटाला भागात ही दगडफेक सुरू होती.

नमाजनंतर रस्त्यावर उतरलेल्या मुसलमानांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. अचानक कुठूनतरी दगड भिरकावण्यात आला आणि दगडफेकीला सुरुवात झाली. पोलिसांना आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराचा वापर करावा लागला. मुराबादाबाद इथेही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मुगलपुरा भागात रस्त्यावर उतरून परिस्थिती तणावग्रस्त बनवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांनी चोपून काढलं.