नर्सिंग प्रवेशासाठी आता सीईटी, येत्या शैक्षणिक वर्षापासून लागू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेशासाठी होणाऱया प्रवेश परीक्षांपाठोपाठ नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीही यापुढे सीईटी (राज्य सामायिक प्रवेश परीक्षा) द्यावी लागणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून आरोग्यसेविका बनण्यास इच्छुक उमेदवारांना सीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे.

ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणाऱया आरोग्य सेविकांना आता एएनएम या नर्सिंगच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा देणे बंधनकारक असणार आहे. ‘राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षा’च्या (सीईटी) सेलने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सीईटी परीक्षेत मिळणाऱया गुणांच्या आधारे नर्सिंग अभ्यासक्रमात प्रवेश मिळणार आहे. बारावीच्या निकालानंतर सीईटी परीक्षा देणे बंधनकारक असणार आहे.

– एएनएमचा अभ्यासक्रम 493 महाविद्यालयांत शिकवण्यात येतो. या अभ्यासक्रमाच्या सुमारे 18 हजार जागा आहेत.
– कोणत्याही शाखेतून बारावी पास झाल्यानंतर या अभ्यासक्रमात प्रवेश घेता येतो.
– एएनएम हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यसेविका म्हणून नोकरीची संधी उपलब्ध आहे.

रुग्णसेवेचे प्रशिक्षण
‘ऑक्झिलरी नर्सिंग मिडवायफरी’ या अभ्यासक्रमासाठी सीईटी होईल. गेल्या वर्षी यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होईल. हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम असून यामध्ये रुग्णांना कशा पद्धतीने सेवा द्यायची याबाबत रीतसर प्रशिक्षण दिले जाईल, असे सीईटी सेलचे आयुक्त संदीप कदम यांनी सांगितले.