तेल कंपन्यांनी पुरवठा केला कमी; श्रीलंकेसारख्या संकटाचे सावट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर तेल कंपन्यांनी इंधन पुरवठा कमी केला आहे. त्याचा परिणाम म्हणून राजस्थानातील तब्बल तीन हजार पेट्रोल पंप बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. 16 जिल्ह्यांत केवळ एक दिवस पुरेल, एवढेच इंधन शिल्लक आहे. पुढील 24 तासांत इंधन पुरवठा न झाल्यास एकाच दिवसात 500 पेट्रोल बंद होणार आहेत. उत्तरेकडील अनेक राज्ये इंधन तुटवडय़ाला सामोरे जात आहेत. या समस्येवर तोडगा न निघाल्यास देशात श्रीलंकेसारखे संकट ओढवण्याची भिती आहे.

राजस्थानच्या पाली जिल्ह्यात एस्सार आणि रिलायन्सच्या 14 पंपांना आधीच टाळे ठोकण्यात आले आहे. 15-20 दिवसांपूर्वी राज्यात रिलायन्स आणि एस्सारचे 1500 हून अधिक पंप बंद करण्यात आले. याठिकाणी इंधन विक्री पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक 1100 पंप एस्सारचे आणि 300 ते 400 पंप रिलायन्सचे आहेत. तसेच उदयपूर, जोधपूर, बांसकाडा, दौसा आणि अलकरसह 16 जिल्ह्यांमध्ये मागील दोन दिवसांपासून इंधन पुरवठय़ाची बोंब आहे. सात दिवसांपासून तेल कंपन्या राज्यातील 6500 हून अधिक पेट्रोल पंपांना मागणीनुसार इंधन पुरवठा करत नसल्याचे पंपचालकांनी सांगितले. त्यामुळे तीन हजारांहून अधिक पंपांवर इंधनाचा दुष्काळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

– मागील काही दिवसांपासून भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या दोन तेल कंपन्यांकडून मागणीनुसार इंधन पुरवठा केला जात नाही. राजस्थानात सध्या केवळ इंडियन ऑईल कंपनीकडून इंधन पुरवठा सुरू आहे. पेट्रोल कंपन्यांचा तोटा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे भारत आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांनी पुरवठा कमी केला आहे.