जुन्या घराची डागडुजी करताना सापडल्या पेट्या, उघडल्यानंतर सापडला…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बऱ्याचदा चित्रपटांमध्ये जुन्या घरांचं चित्रण काहीसं भीतीदायक केलेलं असतं. जुन्या पुसट झालेल्या भिंती, करकर वाजणारे दरवाजे, गळणारं छप्पर अशा एखाद्या घरात जर एखाद्याला जुन्या पेट्या सापडल्या तर? असाच काहीसा प्रकार एका जोडप्यासोबत झाला आहे.

अमेरिकेत एका जोडप्याला जुन्या घरात असं काही सापडलं की त्यामुळे त्यांचं नशीब पालटलं. ब्रॅनिक नावाच्या या माणसाचं ओहियो इथे एक जुनं घर आहे. दुमजली घराची देखभाल करणं हे तसं जिकिरीचं काम असतं. पण, एक दिवस ब्रॅनिकने आपल्या पत्नीसह त्या घराची दुरुस्ती करायला सुरुवात केली. दुसरा आणि पहिला मजला झाल्यानंतर त्याने तळमजला आणि तळघर दुरुस्त करायला घेतलं.

तळमजल्यावर खूप धूळ साचली होती. ती धूळ त्याने बाजूला करायला सुरुवात केली. तिथेच एका चोरकप्प्यात त्याला दोन पेट्या आढळल्या. एका पेटीचा रंग हिरवा आणि दुसरीचा करडा होता. त्या पेट्या फार मोठ्या किंवा जड नव्हत्या. त्यामुळे त्यात स्पोर्ट्स कार्ड्सचं कलेक्शन मिळालं असावं, असा अंदाज ब्रॅनिक आणि त्याच्या पत्नीचा होता.

त्यांनी त्या पेट्या उघडल्यानंतर त्याना आश्चर्याचा धक्काच बसला. या दोन्ही पेट्यांमध्ये रोख पैसे ठेवले होते. दोन्ही सूटकेस मिळून त्यांच्याकडे 45 हजार डॉलर्स म्हणजेच 33 लाख रुपयांहून अधिक पैसे जमा झाले. या जोडप्यावर कर्ज असल्याने हे पैसे अगदी योग्य वेळी मिळाले असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.