
कुठलंही ट्विट करताना विचारपूर्वक करणे गरजेचे आहे याचा परिणाम काहीही होऊ शकतो. अमेरिकेतील एका व्यक्तीला ट्विट करणे चांगलेच महागात पडले आहे. सात वर्षांत केलेल्या 14 ट्विटसाठी एका 72 वर्षीय व्यक्तीला अटक करुन 16 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आल्याची माहिती त्यांच्या मुलाने दिली आहे. ही व्यक्ती फ्लोरिडाचे निवृत्त प्रकल्प व्यवस्थापक आहे.
साद इब्राहिम अल्मादी असे त्या व्यक्तीचे नाव असून ते अमेरीका आणि सौदीचे दुहेरी नागरिक आहेत. रविवारी प्रकाशित होणार्या एका ओपिनियन पीसमध्ये, द वॉशिंग्टन पोस्टचे पत्रकार जोश रोजिन यांच्याशी अल्मादी यांच्या मुलाने संभाषण केले. मुलाच्या म्हणण्यानुसार, अल्मादी यांना गेल्या सात वर्षांत त्यांच्या 14 ट्विटसाठी अटक करण्यात आली आहे. ज्यामध्ये त्यांनी सौदी सरकारच्या राजकीय निर्णयांवर आणि भ्रष्टाचारावर टीका केली होती. आणि ज्यावेळी त्यांनी ट्विट केले होते त्यावेळी ते फ्लोरिडामध्ये राहत होते. तसेच इब्राहिमच्या म्हणण्यानुसार, अल्मादी यांनी सौदी पत्रकार जमाल खशोग्गी यांच्यावरही ट्विट केले होते, ज्यांची 2 ऑक्टोबर 2018 रोजी इस्तंबूलमधील सौदी अरेबियाच्या वाणिज्य दूतावासात हत्या करण्यात आली होती.
असोसिएटेड प्रेसच्या म्हणण्यानुसार, विदेश विभागाचे उपप्रवक्ते वेदांत पटेल यांनी मंगळवारी अल्मादी यांना सौदी अरेबियात ठेवण्यात आल्याबाबत दुजोरा दिला आहे. द गार्डियनला दिलेल्या निवेदनात इब्राहिमने सांगितले की, सौदीच्या एजंटांनी त्याच्या वडिलांचे विमानतळावरून अपहरण केले आणि त्यांच्या फोनची तपासणी करत त्यांना एका हॉटेलमध्ये बंद केले.
इब्राहिमने द गार्डियनला सांगितले की, अल्मादीला त्याचे अमेरिकन नागरिकत्व आणि तेथील त्याच्या कुटुंबाचे चांगले संबंध यामुळे सुट्टीसाठी सौदी अरेबियाला जाणे त्यांना सुरक्षित वाटले. द पोस्टनुसार, अल्मादी नंतर दहशतवादी विचारधारा बाळगणे, सौदी अरेबियाचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करणे आणि दहशतवादाला मदत करणे आणि प्रोत्साहन देणे यासाठी दोषी आढळले. त्यांच्या कारावासाच्या व्यतिरिक्त, सौदी अरेबियाने 16 वर्षांची प्रवास बंदी देखील लादली आहे, म्हणजे त्याची शिक्षा पूर्ण झाल्यास त्याला अखेरीस अमेरीकेत परत येण्याची परवानगी दिली जाईल आणि तेव्हा ते 104 वर्षांचे असतील.
इब्राहिमच्या कुटुंबाने मार्चमध्ये अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याशी संपर्क साधला तेव्हा इब्राहिमने सौदी सरकार वडिलांचा छळ करत असल्याची तक्रार केली. एपीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी परराष्ट्र खात्याने चुकीच्या पद्धतीने त्यांना ताब्यात घेतल्याचा आरोपही केला.


























































