
सामना ऑनलाईन । पनवेल
उत्तर प्रदेशच्या योगी सरकारमध्ये सामील एसबीएसपी मित्रपक्षाने योगी सरकार विरोधात एल्गार पुकारलाय. पक्षाचे अध्यक्ष आणि सरकारमध्ये वरिष्ठ कॅबिनेट मंत्री असलेल्या ओम प्रकाश राजभर यांनी महाराष्ट्रातून योगी सरकारच्या विरोधात रसद गोळा करायला सुरूवात केली आहे. राजभर यांनी योगी सरकारवर दबाव बनवण्यासाठी महाराष्ट्रात धाव घेतली असून त्यांनी मागास समाजाची एक रॅली पनवेल मध्ये आयोजित केली आहे. या रॅलीमध्ये ते ओबीसी आरक्षणाच्या विभागणीची मागणी करणार आहे.

ओबीसींच्या २७% आरक्षणाची विभागणी करून, अतीदलित अतीमागास समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्याची मागणी ओमप्रकाश राजभर यांनी केली आहे. राजभर यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत योगी सरकारवर हल्ला चढवण्याची एकही संधी सोडलेली नाही. महाराष्ट्रात उत्तर हिंदुस्थानींची असलेली लक्षणीय संख्या पाहता या आधीही उत्तर प्रदेशच्या अनेक नेत्यांनी महाराष्ट्रातून लॉबींग केलं आहे. अखिलेश सिंह यांनी तर नवी मुंबईत शक्ती प्रदर्शन केलं होतं. त्यामुळे आता लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर हिंदुस्थानी नेते आपल्या मतदारांना प्रभावित करण्यासाठी महाराष्ट्रात धाव घेत आहेत.
























































