
किडनी विकाराच्या रुग्णांची वाढती संख्या आणि डायलेसिसचा वाढता खर्च विचारात घेऊन सिद्धिविनायक मंदिराच्या वतीने चेंबरमध्ये 11 खाटांचे डायलेसिस सेंटर सुरू करण्यास राज्याच्या विधी व न्याय विभागाने मान्यता दिली आहे. या सेंटरमध्ये अडीचशे रुपयांमध्ये डायलेसिसची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे पूर्व उपनगरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्यात दिवसेंदिवस किडनी विकार रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या आजारावर प्रदीर्घ उपचारांची गरज असते. त्यामध्ये प्रामुख्याने डायलेसिसचा समावेश आहे. अनेकदा डायलेसिस पेंद्र जवळ नसते. त्यासाठी लांब जावे लागते. त्याशिवाय हे उपचार खर्चिक असल्याने अनेक रुग्ण अर्धवट उपचार सोडून देतात. यामध्ये अनेक रुग्णांच्या जिवावर बेतते.
त्यामुळे मुंबईत दररोज किमान 300 रुग्णांना डायलेसिस उपचार उपलब्ध करून देण्याची महत्त्वाकांक्षी योजना श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने आखली आहे. त्यासाठी मंदिर न्यासाच्या वतीने प्रभादेवीत 12 खाटांचे आणि गोरेगाव प्रबोधनमध्ये 8 बेडचे डायलेसिस सेंटर सुरू करण्यात आले आहे.
पूर्व उपनगरातील डायलेसिस सेंटरची वाढती मागणी लक्षात घेऊन चेंबूरच्या सुफला ट्रस्टने स्थापन केलेल्या शरद नारायण आचार्य मेडिकल सेंटरच्या वतीने डायलेसिस सेंटर चालवण्याचा प्रस्ताव सिद्धिविनायक मंदिर न्यासाला दिला होता. या प्रस्तावाला न्यासाने मान्यता दिल्याचे राज्याच्या विधी व न्याय विभागाच्या शासन निर्णयात नमूद केले आहे.
या डायलेसिस सेंटरमध्ये 11 डायलेसिस मशिन्स ठेवण्यात आल्या आहेत. हे सेंटर श्री सिद्धिविनायक डायलेसिस सेंटर म्हणून चालवण्यात येईल. सेंटरचे दैनंदिन देखभाल, दुरुस्ती, वीज, पाणी व भाडय़ाची जबाबदारी सुफला ट्रस्टच्या वतीने उचलण्यात येणार आहे. डायलेसिस सेंटर ऑपरेटिंग एजन्सीमार्फत चालवण्यात येणार आहे. सध्या न्यासाच्या डायलेसिस सेंटरमध्ये रुग्णांकडून 250 रुपये आकारण्यात येतात तेवढीच रक्कम सुफला ट्रस्टमार्फत चालवण्यात येणाऱया सेंटरकडून आकारण्यात येईल.
प्रति रुग्ण 900 रुपये खर्च
या सेंटरमधील 11 डायलेसिस मशिन्सवर दररोज तीन पाळय़ांमध्ये रुग्णांवर डायलेसिस होईल. त्यानुसार दरवर्षाला 10 हजार 296 रुग्णांवर डायलेसिस होईल. एका रुग्णाच्या डायलेसिससाठी न्यासावर 900 रुपयांचा आर्थिक भार पडेल. त्यातून मंदिर न्यासावर दरवर्षाला 93 लाख रुपये आर्थिक बोजा पडेल. न्यायाच्या 2022-23च्या अर्थसंकल्पात वैद्यकीय प्रकल्पाअंतर्गत डायलेसिस सेंटरच्या दैनंदिन खर्चासाठी दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.





























































