
सामना प्रतिनिधी । मुंबई
चर्चगेट स्थानकाजवळ होर्डिंग कोसळून एक जण ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी 12.45 वाजण्याच्या सुमारास घडली. मधुकर नार्वेकर (62) असे या दुर्घटनेत मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या दुर्घटनेमुळे मुंबईतील होर्डिंगचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
चर्चगेट स्थानक मुख्यालयाच्या इमारतीवर महात्मा गांधींचे 15 फुटी भलेमोठे होर्डिंग लावण्यात आले आहे. 2017 मध्ये हे होर्डिंग बनवण्यात आले होते. आज दुपारी नार्वेकर हे चर्चगेट स्थानकाजवळ आले असताना या होर्डिंगचे सहा चौकोनी भाग अचानक थेट खाली कोसळले. यात नार्वेकर यांच्यासह दोन पादचारीही जखमी झाले. या तिघांनाही जवळच्या जी. टी. रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या नार्वेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चर्चगेट स्थानक इमारतीवर रंगकाम पूर्ण झाल्यानंतर एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून ब्राझीलचा स्ट्रीक आर्टिस्ट एडुआर्डे कोबरा याने इमारतीवर महात्मा गांधी यांचे चित्र रेखाटले आहे. दरम्यान, मृत नार्वेकर यांच्या कुटुंबीयांना रेल्वे प्रशासनाने पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.
जोराच्या वाऱयामुळेच होर्डिंगकोसळल्याचा अंदाज
गुजरातमध्ये आलेले ‘वायू’ चक्रीवादळ आणि मुंबईच्या किनाऱयापासून काही मीटर अंतरावर असल्यामुळे आज दुपारच्या सुमारास जोरदार वाऱयासह पाऊसही सुरू होता. या जोराच्या वाऱयामुळेच हे होर्डिंग कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, चर्चगेट रेल्वे पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
कामावर निघाले असताना काळाचा घाला
दहिसर पूर्व येथे राहणारे मधुकर नार्वेकर हे कुलाबा येथे खासगी कंपनीत कामाला होते. दररोजप्रमाणे सकाळी 10.30 वाजता घरातून कामावर निघाले होते, मात्र कामावर पोहोचण्याआधीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली आहेत. दुर्घटनेनंतर रेल्वेने त्यांना 15 हजार रुपयांची तातडीची मदत दिली असून आणखी भरपाई देण्याचे आश्वासन दिल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.
वांद्रय़ात स्कायवॉकचा पत्रा कोसळून तीन जखमी
वांद्रे पश्चिम येथे स्कायवॉकच्या पत्र्याच्या शेड अंगावर कोसळून तीन महिला जखमी झाल्याची घटना एस. व्ही. रोडवर घडली. या घटनेनंतर जखमी महिलांना जवळच्याच भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मालिसा नजरात (30), सुलक्षणा माझे (41), तेजल कदम (27) अशी जखमी महिलांची नावे आहेत. जोरदार वाऱ्यायामुळे स्कायवॉकला लावण्यात आलेले पत्र्याच्या शेड निखळून पडल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.


























































