
सामना ऑनलाईन । भोपाळ
मध्यप्रदेशमधील टिकमगढ येथे एका निष्ठूर मातापित्याने त्यांच्या एक महिन्याच्या मुलीला बॅगेत भरून मंदिराच्या पायऱ्यांवर सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्या मुलीला तत्काळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केले आहे. मंदिराच्या आजुबाजुच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा सर्व प्रकार रेकॉर्ड झाला असून पोलीस सध्या त्या दाम्पत्याचा शोध घेत आहेत.
टिकमगढमधील रामराजा मंदिराच्या पायऱ्यांवर आज पहाटे एक बेवारस बॅग सापडल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर काही वेळाने त्या बॅगेतून बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ लागल्याने तेथे जमलेल्या लोकांनी बॅग उघडली. त्या बॅगेत एक बाळ रडत होतं हे बघून सर्वांना धक्का बसला. लोकांनी तत्काळ याबाबत पोलिसांना कळवले. पोलिसांनी त्या मुलीला रुग्णालयात दाखल केले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. पोलीस सध्या त्या मुलीच्या पालकांचा शोध घेत आहे.

























































