हिमालय पादचारी पूल दुर्घटना प्रकरण, पालिकेच्या कार्यकारी अभियंत्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

हिमालय पादचारी पूल दुर्घटना प्रकरणात आझाद मैदान पोलिसांनी मंगळवारी पालिकेच्या ब्रिज विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला अटक केली. अनिल पाटील (53) असे त्या अभियंत्याचे नाव असून दुर्घटनेनंतर पालिका आयुक्तांनी पाटील याला निलंबित केले होते. तर याच विभागाचा निलंबित सहाय्यक अभियंता संदीप काकुळते याला कोर्टात हजर केले असता त्यांना 5 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

अनिल पाटील आणि संदीप काकुळते हे दोघेही पालिकेच्या शहर ब्रिज विभागात कार्यरत होते. पूल कोसळल्यानंतर या दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आझाद मैदान पोलिसांनी केलेल्या तपासात पूल दुर्घटनेला या दोघांचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी सोमवारी काकुळतेला अटक केली, तर आज कार्यकारी अभियंता अनिल पाटील यांना बेडय़ा ठोकण्यात आल्या. पाटील यांना उद्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे. हे दोघे ब्रिज विभागात कार्यरत असल्याने पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे, साइटवर जाऊन कामाचे प्रत्यक्ष निरीक्षण करणे हे दोघांचे काम होते, पण त्यांनी तसे काहीच केले नाही. ते कधी स्वतः साइटवर गेले नाहीत. पुलाची जितक्या वेळा डागडुजी झाली त्याचे निरीक्षणसुद्धा त्यांनी केले नाही. डी. डी. देसाईज कंपनीने स्ट्रक्चरल ऑडिट केले, जियो डायनॅमिक कंपनीने नॉन ड्रिस्टिक्टिव्ह टेस्ट केली. तसेच पालिकेच्या ए वॉर्डने पुलाच्या डागडुजीचे काम केले. या कुठल्याही कामाचे स्वतः निरीक्षण या दोघांनीही केले नाही, पण ते करणे गरजेचे होते. अशा प्रकारे पाटील आणि काकुळते यांचा हलगर्जीपणा पूल दुर्घटनेला जबाबदार असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यामुळे दोघांनाही अटक केल्याचे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितले

वर्षानुवर्षे एकाच विभागात
संदीप काकुळते 2005 मध्ये पालिकेत दुय्यम अभियंता म्हणून रुजू झाले तेव्हापासून ते रस्ते, वाहतूक आणि ब्रिज याच विभागात कार्यरत होते. 2013 मध्ये ब्रिज विभाग वेगळा करण्यात आल्यानंतर तेथे ते सहाय्यक अभियंता म्हणून काम करत होते. त्यांच्याकडे शहरातील 39 पुलांच्या कामाची जबाबदारी होती, पण त्यांनी कधीच प्रत्यक्ष साइटवर जाऊन काम केलेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तर अनिल पाटील हे सप्टेंबर 2014 ते डिसेंबर 2018 या कालावधीत ब्रिज विभागात कार्यकारी अभियंता म्हणून काम करत होते.