
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
मृग नक्षत्र लागल्यापासून दडी मारून बसलेल्या पावसाने सोमवारी तुरळक, तर मंगळवारी धुवाधार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह मंगळवारी रात्री धो धो पाऊस पडला. अर्धा तास झालेल्या या पावसामुळे सखल भागात पाणी साचले, तर नालेही वाहिले. जयभवानीनगर भागातील नाल्यात एक जण वाहून गेला, तर हर्षनगरात घरात पाणी शिरले. पुंडलिकनगर रोडवर झाड कोसळल्याची घटना घडली. याशिवाय काही भागांत विजेचा पुरवठा खंडित झाला. तथापि, उकाड्यामुळे हैराण झालेल्या संभाजीनगरकरांना मात्र आजच्या या पावसाने दिलासा मिळाला.
मृग नक्षत्र लागल्यानंतरही पावसाने जिल्ह्यात समाधानकारक हजेरी लावली नाही. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांत जोरदार पाऊस होत असला तरीही संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांकडे मात्र पावसाने पाठ फिरवली. काल सोमवारी शहरासह जिल्ह्यातील काही भागात मृगाचा पाऊस झाला. आज, दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना रात्री मात्र पावसाने दिलासा दिला. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसात पुंडलिकनगर रस्त्यावर एक झाड कोसळले. जयभवानीनगर परिसरात अॅक्सीस बँकेजवळील नाल्यात रात्री ११ वाजेच्या सुमारास एक जण वाहून गेला. अग्निशमन दलाचे जवान रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेत होते.
रात्री ९ वाजता वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. संभाजीपेठ, क्रांती चौक, सिडको-हडको, हर्सूल, मुकुंदवाडी, सातारा, नक्षत्रवाडी, पडेगाव, जटवाडा, चिकलठाणा असा सर्वदूर पाऊस झाला. अर्धा तास झालेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले. अनेक दुकानांसह घरांमध्ये पाणी शिरले. त्यातच वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. खरेदीसाठी बाजारपेठेत आलेल्या नागरिकांची धावपळ झाली. रात्री उशीरापर्यंत पावसाच्या सरी कोसळत होत्या.

































































