
राजापूर तालुक्यातील कुवेशी येथील तुळसुंदे वाडीत आज सकाळी साडेदहाच्या दरम्यान येथील जुबेदा अन्वर खान यांच्या घरात शिरलेल्या बिबट्याने एका व्यक्तिवर हल्ला करून त्याला जखमी केले आहे. काशिनाथ जाधव, असे जखमी झालेल्या इसमाचे नाव असून बिबट्याच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
कुवेशी-तुळसुंदेवाडी येथे शुकवारी सकाळी जुबेदा खान यांच्या घरासमोरील झाडीमधून आलेले एक चार ते पाच महिन्याचे बिबट्याचे पिल्लू त्यांच्या घरात शिरले. बिबट्या जुबेदा खान यांच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत असताना खान यांच्या घरी काही कामानिमित्त काशीनाथ जाधव आले होते. त्यांनी समोरचे दृष्य पाहून मोठ्याने आरडाओरड करीत त्या बिबट्याला पळवून लावले, मात्र जाता जाता बिबट्याने काशिनाथ जाधव यांच्यावर हल्ला चढविला. त्यामध्ये जाधव यांच्या हाताला किरकोळ जखम झाली. या बिबट्यासोबत मादी बिबट्या असण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यानंतर आठ दिवसांत प्रभाकर लिंगायत यांच्या गायीवर सायंकाळी बळवंत शिर्के यांच्या घराशेजारी बिबट्याने हल्ला चढविला होता. याची लेखी तक्रार वनविभागाकडे करण्यात आली आहे. यापूर्वीही अनेक वेळा भटक्या कुत्र्याचा बिबट्याने फडशा पडला आहे. कुवेशी गावातील अनेक शेतकरी हे आंबा, काजू बागायतदार आणि अन्य शेती, नागली, भात अशी अनेक प्रकारची शेती करत असून शेतकरी एकटे शेतात ये-जा करत असतात तसेच काही शेतकरी गुरे व शेळ्या मेंढ्या चरण्याकरिता नेतात. बिबट्याच्या हल्ल्याने कुवेशी गावातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, याची वनविभागाने आणि प्रशासनाने वेळीच गंभीर दखल घ्यावी आणि बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.




























































