जम्मू आणि कश्मीरच्या किश्तवाड जिह्यातील जंगलात लपून बसलेले दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये चकमक सुरूच असून आज दहशतवाद्यांच्या गोळीबारात लष्कराच्या पॅरा 2 विशेष दलातील अधिकारी राकेश कुमार शहीद झाले, तर तीन जवान गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, नुकतीच 2 ग्राम संरक्षण रक्षकांची दहशतवाद्यांनी गोळय़ा घालून हत्या केली होती. त्यानंतर लष्कराने दहशतवाद्यांनी शोधमोहीम अधिक तीव्र केली होती.
नायब सुभेदार राकेश कुमार असे शहीद झालेल्या लष्करी अधिकाऱयाचे नाव असून व्हाईट नाईट कॉर्प्सने त्यांच्या बलिदानाला सलाम केला आहे. सध्याच्या या कठीण प्रसंगी आम्ही राकेश कुमार यांच्या कुटुंबीयांसोबत खंबीरपणे उभे आहोत, अशा भावना लष्कराने ट्विटद्वारे व्यक्त केल्या आहेत. सकाळी 11 च्या सुमारास लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त मोहिमेदरम्यान किश्तवाडच्या जंगलात दहशतवाद्यांसोबत चकमक उडाली. या परिसरापासून काही किलोमीटर अंतरावरच काही दिवसांपूर्वी नाझीर अहमद आणि कुलदीप कुमार या दोन ग्राम संरक्षण रक्षकांचे मृतदेह सापडले होते. त्यानंतर गुरुवारी सायंकाळपासून किश्तवाड आणि केशवान जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांची तीव्र शोधमोहीम राबवण्यात आली. किश्तवाडच्या जंगलात सुरक्षा दल आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम सुरू केली असून जंगल पिंजून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पावले उचलल्याची माहिती लष्कराच्या जम्मू येथील व्हाईट नाईट कॉर्प्सने एक्सवरून दिली आहे.
48 तासांत तीन चकमकी
जम्मू-कश्मीरात 9 नोव्हेंबरच्या सायंकाळपासून बारामुल्ला, श्रीनगर आणि किश्तवाड जिह्यात दहशतवाद्यांची शोधमोहीम सुरू होती. यादरम्यान 48 तासांत तीन चकमकी उडाल्या. जम्मूतील चिनाब खोऱयातील किश्तवाडच्या जंगलात रविवारी सकाळी झालेल्या चकमकीत चार जवान गंभीर जखमी झाले. यातील राकेश कुमार यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला तर तीन जवानांची प्रकृती गंभीर आहे. बारामुल्लाच्या सोपोर येथेही आज शोधमोहीम राबवण्यात आली.
श्रीनगरच्या इशबार गावात कमीत कमी तीन सशस्त्र दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सुरक्षा दलांनी या परिसरात शोधमोहीम राबवली. यादरम्यान सकाळी 9 वाजल्यापासून 45 मिनिटे लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. या चकमकीत कुणीही मारले गेल्याचे वृत्त नाही. यावेळी दोन स्थानिक नागरिकांचा जीव पोलिसांनी वाचवला.
चार दहशतवाद्यांना घेरले
चकमक अजूनही सुरूच असून लष्कराने तीन ते चार दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती लष्कराच्या अधिकाऱयांनी दिली. निरपराध गावकऱयांना मारणाऱया दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचा निर्धार लष्कराने केला असून श्रीनगरमध्ये पूर्वेकडील सीमेला लागून असलेल्या जबरवान या डोंगराळ परिसरात दहशतवाद्यांची तीव्र शोधमोहीम राबवण्यात येत असल्याचे लष्कराने स्पष्ट केले आहे.