
मित्राच्या वाढदिवसाला तलवारीने केक कापणे तरूणाच्या अंगलट आले आहे. संबंधित तरूणाला गुन्हे शाखेने अटक केली असून त्याच्याकडून तलवार जप्त करण्यात आली आहे. अरबाज अमीर खान (वय 22, रा. लोहियानगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. अरबाजने लोहियानगरमध्ये मित्राच्या वाढदिवसाला केक कापण्यासाठी तलवार दिली होती.
वसाहतीमध्ये अरबाज दहशत करण्यासाठी तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेतील इम्रान शेख यांना मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलीस उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, इम्रान शेख, अय्याज दड्डीकर, योगेश जगताप, महेश बामगुडे यांनी अरबाजला पकडले. त्याच्याकडून तलवार जप्त करण्यात आली आहे.
दरम्यान, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहरातील गुंड टोळ्यांतील सराईतांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार दहशत माजवणाऱ्या गुंडांवर नजर ठेवण्यात येत असून वाढदिवसाला तलवारीने केक कापणे, व्हॉट्सअॅप ‘स्टेटस’ वर शस्त्रांची छायाचित्रे ठेवणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
























































